औरंगाबाद महापालिकेत पुन्हा महिलाराज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

पुढील अडीच वर्षांसाठी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण

औरंगाबाद- राज्यातील 27 महापालिकांच्या पुढील अडीच वर्षांच्या महापौरपदासाठी बुधवारी (ता. 13) मुंबईत आरक्षण काढण्यात आले. औरंगाबाद महापालिकेचे आरक्षण सर्वसाधारण (खुला) प्रवर्गातील महिलांसाठी जाहीर झाले आहे. त्यामुळे महापौरपदी पुन्हा एकदा महिलेची वर्णी लागणार आहे. 
औरंगाबाद महापालिकेची मार्च किंवा एप्रिल 2020 मध्ये निवडणूक होणार आहे.

त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. दरम्यान, महापौरपदाच्या आरक्षणाबाबतही ऑगस्ट महिन्यातच नगर विकास विभागाने माहिती मागविली होती. राज्यातील 27 महापालिकांच्या महापौरपदाचा अडीच वर्षाचा कालावधीही संपुष्टात येणार असल्याने नगरविकास विभागाने बुधवारी मंत्रालयात प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली सोडत काढली. त्यात औरंगाबाद महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी निघाले.

सध्या नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या महापौरपदावर नंदकुमार घोडेले विराजमान आहेत. त्यांचा कार्यकाळ 29 एप्रिल 2020 ला संपणार आहे. त्यासोबतच महापालिकेचा पाच वर्षांचा कार्यकाळही संपणार आहे. 
 
पाचव्यांदा महिलेला मिळणार मान 
महापौरपद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी यापूर्वी चारवेळेस आरक्षित झाले होते. 1995 मध्ये शिवसेनेतर्फे सुनंदा कोल्हे यांची वर्णी लागली. त्यानंतर 2004 मध्ये रुक्‍मिणी शिंदे, 2007 मध्ये भाजपच्या विजया रहाटकर, 2012 मध्ये शिवसेनेच्या कला ओझा यांची महापौरपदावर निवड झाली. आता 2020 मध्ये खुल्या प्रवर्गातून महिला महापौरपदी विराजमान होणार असून, पाचव्यांदा हा मान खुल्या प्रवर्गातील महिलेला मिळाला आहे. 

इच्छुकांमध्ये आतापासूनच उत्साह 
महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. प्रभाग पद्धतीने यंदा पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. प्रभाग रचना तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग तयार होणार असून, त्यामुळे उमेदवारांची निवडून येण्यासाठी आवश्‍यक मते मिळविताना दमछाक होणार आहे. 115 पैकी 57 वॉर्ड महिलांसाठी राखीव असतील. दरम्यान, प्रभागरचना करताना भौगोलिक रचनेनुसार वॉर्ड एकमेकांना न जोडता वॉर्ड क्रमांकानुसार जोडले जात असल्यामुळे इच्छुकांसाठी ही निवडणूक आव्हानात्मक असणार आहे. असे असले तरी आरक्षण सोडत निघताच इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विद्यमान नगरसेवकांमध्ये 10 ते 15 महिला खुल्या प्रवर्गाच्या आहेत; मात्र यावेळी महापौरपदाची संधी न मिळाल्याने पुढील निवडणुकीत विजय मिळविण्याबरोबरच महापौरपदावरही त्यांचा डोळा असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahilaraj in municipality