महमूद दरवाजा पादचाऱ्यांसाठी खुला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - ट्रक धडकल्यामुळे धोकादायक बनलेला पाणचक्कीचा महमूद दरवाजा बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर तात्पुरती डागडुजी करून पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात येत आहे; मात्र येथून कोणत्याही वाहनाला प्रवेश देऊ नये, असे पत्र महापालिकेने पोलिसांना दिले आहे.

औरंगाबाद - ट्रक धडकल्यामुळे धोकादायक बनलेला पाणचक्कीचा महमूद दरवाजा बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर तात्पुरती डागडुजी करून पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात येत आहे; मात्र येथून कोणत्याही वाहनाला प्रवेश देऊ नये, असे पत्र महापालिकेने पोलिसांना दिले आहे.

आधीच मोडकळीस आलेला महमूद दरवाजा गेल्या आठवड्यात ट्रक धडकल्यामुळे धोकादायक बनला. तेव्हापासून महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी येथील वाहतूक बंद केली. पर्यायी पूल नसल्यामुळे बेगमपुरा, जयसिंगपुरा, पहाडसिंगपुरा, भावसिंगपुरा, विद्यापीठ, नागसेनवन आणि छावणीकडे जाणाऱ्या नागरिकांना मकाई गेट आणि बारापुल्ला गेटवर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. यातच बुधवारी (ता. २२) बकरी ईदनिमित्त ईदगाहकडे जाण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे महापालिकेने दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी खिळखिळ्या झालेल्या कमानींना लोखंडी ‘सी’ चॅनेलचा आधार देऊन तात्पुरती डागडुजी सुरू केली आहे; मात्र तरीही धोका कायम असल्यामुळे येथून कुठल्याही दुचाकी, चारचाकी वाहनाला प्रवेश देऊ नये, असे पत्र महापालिका उपायुक्त (महसूल) मंजूषा मुथा यांनी वाहतूक शाखेच्या सहायक आयुक्तांना सोमवारी (ता. २०) पाठवले आहे. त्यामुळे हा दरवाजा खुला असेपर्यंत पोलिसांना येथे बंदोबस्त कडक करावा लागणार आहे.

संवर्धनाचे काम लवकरच
महमूद दरवाजाची कागदोपत्री मालकी वक्‍फ बोर्डाकडे आहे; मात्र त्यांनी या दरवाजाकडे कधी ढुंकूनही पाहिले नाही. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत महापालिका आयुक्तांनी त्याचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला असून, सध्या तात्पुरती डागडुजी करण्यात येत असली तरी ईदनंतर संवर्धनाचे काम लगेच सुरू केले जाईल, असे वास्तुविशारद प्रदीप देशपांडे यांनी सांगितले.

घाटीच्या रस्त्यावर भार
पाणचक्कीच्या पुलावरील वाहतूक बंद असल्यामुळे त्याचा संपूर्ण भार घाटीच्या रस्त्यावर पडत आहे. ज्युबली पार्ककडून मकाई गेटकडे जाणाऱ्या वाहनांमुळे दिवसरात्र रुग्णांची गर्दी आणि रुग्णवाहिकांची वर्दळ असणाऱ्या घाटीतील अरुंद अंतर्गत रस्त्यावरही वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. यामुळे रुग्णालयाच्या अपघात विभागासमोरच अपघाताचा धोका वाढला आहे.

Web Title: Mahmood Door Open