माहूरला बुद्ध लेणी म्हणूनच झाली होती सुरुवात : अतुल भोसेकर

प्रमोद चौधरी
Monday, 6 April 2020

माहूर (जि.नांदेड) येथील लेणी अंदाजे सहा ते सातव्या शतकातील राष्ट्रकूट काळातील असून हा काळ लेणी स्थापत्यातील संक्रमणाचा काळ मानण्यात येतो. कारण साधारण याच काळात बुद्ध लेणी कोरण्याचे काम कमी होत गेले आणि जैन, हिंदू लेण्यांचे कोरीव काम सुरू झाले. 

नांदेड : माहूरची लेणी पाहताना हे निश्चित होते की, ही लेणी बुद्ध लेणी म्हणून सुरुवात झाली होती. मात्र,  नंतर मिळालेला कमी राजाश्रय किंवा लोकाश्रयामुळे या लेणींचे काम थांबले असावे. कालांतराने ही लेणी अतिक्रमणित होऊन, हिंदू लेणी म्हणून हिचे काही वाढीव काम करण्यात आले होते. या लेणींच्या स्थापत्यमध्ये या संक्रमण काळातील खुणा स्पष्ट दिसत असल्याचे लेणी अभ्यासक अतुल भोसेकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
 
अतुल भोसेकर हे भारतातील लेण्यांचे अभ्यासक असून, ट्रिबिल्स-प्राचीन भाषा, लिपी आणि पुरातत्व संशोधन संस्था नाशिकचे संचालक आहेत.  त्यांनी सांगितले की, सध्या माहूर लेणी ही बुद्ध लेणी कि पांडव लेणी असा विषय चर्चिला जात आहे. परिणामी इतिहासप्रेमींसह पर्यटक व अभ्यासकांमध्ये विनाकारण संभ्रम निर्माण होत आहे. वास्तविक पाहता माहूरच्या लेणीत कुठलेही शिलालेख नसल्यामुळे त्याच्या पुरातत्त्वीय प्रमाण आणि संरचनेवरून काळ निश्चित केला आहे. 

हेही वाचा - ‘कोरोना जावो, हाताला काम मिळो’; घिसडी समाजाची आर्त हाक

१९५३ मध्ये माहूर येथील ही लेणी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या औरंगाबाद विभागांतर्गत नोंद करण्यात आली आहे. पुढे १९८१ मध्ये सर्वेक्षणचे के. वी. सौंदराजन यांनी या लेणीचा पहिल्यांदा अभ्यास केला. त्यानुसार ही लेणी अंदाजे सहा ते सातव्या शतकातील राष्ट्रकूट काळातील असून हा काळ लेणी स्थापत्यातील संक्रमणाचा काळ मानण्यात येतो. कारण साधारण याच काळात बुद्ध लेणी कोरण्याचे काम कमी होत गेले आणि जैन आणि हिंदू लेण्यांचे कोरीव काम सुरू झाले. 

हे देखील वाचाच ब्रेकींग- इंडोनेशियाच्या १० तबलीकीनी वाढविला नांदेडचा ताप

भारतामध्ये अंदाजे एक हजार २०० लेणी असून त्यातील जवळपास एक हजार लेणी या महाराष्ट्रात कोरल्या गेलेल्या आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्रातील लांबच्या लांब सह्याद्रीची, कठीण बसाल्ट दगडांची रांग आहे. भारतात पहिली लेणी कोरली ती सम्राट अशोकाने.  इ.स.पूर्व २७५ मध्ये सम्राट अशोकाने भारतात पहिली लेणी कोरली आहे. त्यानंतर ही प्रस्तर कला बिहार, बंगाल, ओडिशा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या ठिकाणी पसरली. महाराष्ट्रातील एकूण लेण्यांपैकी ८० टक्के लेण्या या बौद्ध असून १५ टक्के जैन आणि पाच टक्के हिंदू लेण्या असल्याचेही लेणी अभ्यासक अतुल भोसेकर यांनी स्पष्ट केले आहे. 

येथे क्लिक कराVideo : ‘कोरोना’शी लढा : नांदेडच्या आदित्यची ‘फेस शिल्ड’ किट ठरतेय वरदान

राष्ट्रकुट काळातील लेणीचे जतन व्हावे

Image may contain: one or more people and suit
अतुल भोसेकर

माहुर येथील लेणीकडे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणने दुर्लक्ष केल्यामुळे व वातावरणातील अनेक घटकांमुळे या लेणीची बरीच पडझड झाली आहे. राष्ट्रकूट काळातील ही लेणी असल्यामुळे तिचे जतन करणे आवश्यक आहे. 
- अतुल भोसेकर, लेणी अभ्यासक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahur had Started as Buddha Caves Nanded News