राजीनामा देण्यासाठी प्रकाश सोळंके मुंबईला रवाना : Video

कमलेश जाब्रस
Tuesday, 31 December 2019

माजलगांव मतदारसंघातील असंख्य कार्यकर्त्यांनी राजीनामा देऊ नये, अशी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु आमदार प्रकाश सोळंके यांनी 'राजकारणाचा मला वीट आला आहे. आपण राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षामध्येच राहणार, पक्षाशी गद्दारी करणार नाही,' असे सांगितले.

माजलगांव (जि. बीड) : महाविकास आघाडी शासनाच्या झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात माजलगांव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मंत्रीपद न दिल्याच्या नाराजीतून आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील बंगल्यावर आणि लोणावळ्यातील हॉटेलवर कार्यकर्त्यांशी झालेल्या बैठकीनंतर ते आता विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा देण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस वाढीसाठी महत्वाची भूमिका त्यांनी सुरवातीपासूनच बजावली आहे. तसेच पंचायत समिती सभापती ते राज्याच्या मंत्रीपदापर्यंत काम करत आपला वेगळा ठसा राज्याच्या राजकारणामध्ये आमदार प्रकाश सोळंके यांनी उमटविलेला आहे. विधानसभेत चौथ्यांदा आमदार म्हणून वरिष्ठ असल्याने पक्षाकडुन प्रकाश सोळंके यांना मंत्रीपद मिळणार याची सोळंके समर्थकांना अपेक्षा होती. परंतु सोमवारी (ता. 30) मंत्रीमंडळ विस्तारात आमदार सोळंके यांचे नाव आले नाही. 

वाचा - महाविकास आघाडीच्या नेत्यांचे शेतकरीप्रेम पुतनामावशीचे

यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी नाराज होऊन पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले, तर आमदार प्रकाश सोळंके यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून त्यावर आपण ठाम असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान पुणे येथे त्यांच्या निवासस्थांनी माजलगांव मतदारसंघातील असंख्य कार्यकर्त्यांनी राजीनामा देऊ नये, अशी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु आमदार प्रकाश सोळंके यांनी 'राजकारणाचा मला वीट आला आहे. आपण राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षामध्येच राहणार, पक्षाशी गद्दारी करणार नाही,' असे सांगत पुणे येथुन मुंबई येथे जात असतांना लोणावळा येथे कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेउन आपण राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सोळंके यांनी सांगीतले.

हेही वाचा - बीडच्या अधिकाऱ्याला का फासले काळे

यावेळी बाजार समितीचे सभापती अशोक डक, बजरंग सोनवणे, जयसिंह सोळंके, सुनिल रूद्रवार, शेख मंजुर, सुशिल सोळंके, जयदत्त नरवडे, उपसभापती डाॅ. वसिम मनसबदार, एकनाथ मस्के, दिनकर शिंदे, शरद भांडेकर, चंद्रकांत शेजुळ, कल्याण आबुज, प्रा. प्रकाश गवते, शरद चव्हाण, लालासाहेब तिडके, राहुल लंगडे, नासेर पठाण, सरपंच श्री. आजबे, प्रशांत सावंत, राज पाटील यांचेसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Majalgaon MLA Prakash Solanke On The Way To Mumbai To Resign Beed Breaking News