माजलगाव पंचायत समितीवर कुणाचे वर्चस्व?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 डिसेंबर 2019

पंचायत समितीच्या उपसभापतीपदासाठी रस्सीखेच सुरू असून विद्यमान उपसभापती डॉ. वसिम मनसबदार हे आमदार प्रकाश सोळंके यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.

माजलगाव (जि. बीड) : राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या येथील पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी आरक्षण सोडतीमध्ये ओबीसी महिलांसाठी आरक्षण जाहीर झाल्याने सभापतीपदाची माळ सोनाली भागवत खुळे यांच्या गळ्यात पडणार, हे निश्‍चित असून शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.

येथील पंचायत समितीचे सभापती आमदार, मंत्री झाल्याचा इतिहास आहे. राजकीयदृष्ट्या या पंचायत समितीला वेगळे महत्त्व आहे. बारा सदस्य असलेली माजलगाव पंचायत समिती आहे. विद्यमान सभापती आमदार प्रकाश सोळंके यांचे कट्टर समर्थक जयदत्त नरवडे यांच्या पत्नी अलका नरवडे या आहेत.

हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही

नुकतेच सभापतीपदासाठी आरक्षण जाहीर झाले असून सभापतीपदासाठी ओबीसी महिलांकरिता आरक्षित आहे. सावरगाव पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या अंबिका काळे या ओबीसी महिला सदस्या असून त्या छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष मोहन जगताप यांच्या त्या वेळच्या जनविकास आघाडीकडून निवडून आलेल्या आहेत.

हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे

मोहन जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. भाजपचे संख्याबळही दोन असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दहा सदस्य आहेत. टाकरवण गणाच्या पंचायत समिती सदस्या सोनाली भागवत खुळे यांची सभापतीपदी निवड होणार हे निश्‍चीत असुन त्यावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. 

कोण होणार उपसभापती? 

पंचायत समितीच्या उपसभापतीपदासाठी रस्सीखेच सुरू असून विद्यमान उपसभापती डॉ. वसिम मनसबदार हे आमदार प्रकाश सोळंके यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.

हेही वाचा - फटाका तोंडात फोडला...अन असे घडले...

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ. मनसबदार यांनी पात्रुड जिल्हा परिषद सर्कलमधून मोठे मताधिक्‍य मिळवून दिल्याने त्यांना कायम ठेवण्यात येईल का? किंवा बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूराव पोटभरे यांच्याशी जवळीकता असलेले श्रीहरी मोरे यांच्या पत्नी उषा मोरे यांना संधी मिळणार किंवा शिवाजी डाके, चंद्रकांत वानखेडे यांची वर्णी लागणार? हे आमदार सोळंके ठरविणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Majalgaon Panchayat Samiti Election Beed News