वारोळाच्या आश्रमशाळेत पहिलीपासून सेमी इंग्रजी शिक्षण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

माजलगाव - पहिलीपासून सेमी इंग्रजीचे शिक्षण देणारी, तसेच ई- लर्निंग व डिजिटल शिक्षण देणारी वारोळा येथील प्राथमिक आश्रम शाळा ग्रामीण भागातील राज्यातील पहिली शाळा असल्याचा दावा शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कचरे यांनी केला आहे. 

माजलगाव - पहिलीपासून सेमी इंग्रजीचे शिक्षण देणारी, तसेच ई- लर्निंग व डिजिटल शिक्षण देणारी वारोळा येथील प्राथमिक आश्रम शाळा ग्रामीण भागातील राज्यातील पहिली शाळा असल्याचा दावा शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कचरे यांनी केला आहे. 

तालुक्‍यातील वारोळा येथे सामाजिक न्याय विभागाअंतर्गत प्राथमिक आश्रम शाळा आहे. ही शाळा निवासी असून या शाळेत विमुक्त जाती व भटक्‍या जमाती व उपेक्षित घटकांतील मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकले पाहिजेत, यासाठी इयत्ता दुसरीपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जात आहे. या शाळेत लोकसहभागातून सावित्रीबाई कक्ष, राजर्षी शाहू महाराज कक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कक्ष अशा तीन खोल्या ई- लर्निंग व डिजिटल करण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी झाले आहे. ग्रामस्थांकडून एक लाख रुपयांचा, तर शिक्षकांकडून पन्नास हजार रुपयांचा असा एकूण दीड लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. ज्ञानरचनावादावर अधारित शिक्षण शाळेत दिले जाते. तसेच प्रत्येकी आठ विद्यार्थ्यांचे गट तयार करून प्रत्येक गटाला वेगवेगळे किल्ल्यांची, फुलांची, पक्ष्यांची नावे दिली आहेत. प्रत्येक गटाला एक गटप्रमुख नेमलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती लक्षात येते. प्रत्येक महिन्याला पालक मेळावा घेऊन मुलांच्या प्रगतीची माहिती पालकांना दिली जाते. मुलांना संगणक शिक्षण देण्यावर शाळेचा भर आहे.

परिसरातील, तसेच तांडा वस्तीतील दहा गावांतील मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. ऊसतोड व विमुक्त जाती व भटक्‍या जमातीच्या मुलांसाठी ई- लर्निंग व डिजिटल शिक्षण दिले जात असून २०१५-१६ पासून इयत्ता पहिलीपासून सेमी इंग्रजी शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा वारोळा येथील प्राथमिक आश्रमशाळा ठरली आहे. शाळेमध्ये विविध उपक्रम राबविण्यासाठी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक जे. बी. पांचाळ यांच्यासह व्ही. आर. जाधव, एम. एम. प्रधान, एस. के. शिंदे, एच. के. कांबळे, व्ही. पी. वखरे हे प्रयत्न करीत आहेत. 

आता शाळा सिद्धीसाठी प्रयत्न
वारोळा प्राथमिक आश्रम शाळेसाठी ग्रामस्थांनी एक लाख रुपयांचा निधी लोकसहभागातून दिला असून शिक्षकांनी पन्नास हजार रुपये दिले आहेत. शाळेत ई-लर्निंग, डिजिटल शिक्षण, सेमी इंग्रजी, स्पर्धा परीक्षा, ज्ञानरचना वादावर अधारित शिक्षण आदी उपक्रम राबविले जात असून आगामी काळात शाळा सिद्धी या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमासाठी काम करीत असल्याचे मुख्याध्यापक कचरे यांनी सांगितले.

Web Title: majalgav marathwada news first class semi english school in varola ashramshala