मिकी माऊसचा बलून उडाल्याने एक ठार तर चार जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

संगमेश्वर मंदिरामध्ये एका धार्मिक कार्यक्रमाची सांगता होती, तेव्हा या परिसरात लहान मुलांसाठी खेळण्यास ठेवलेल्या मिकी माऊसचा बलून पाच मुलांना घेऊन चाळीस फूट उंच उडाला! 

हिंगोली : कनेरगांव नाका (ता. हिंगोली) येथे मिकी माऊसच्‍या बलूनमध्ये मुले खेळत असताना अचानक वादळी वाऱ्याने बलून चाळीस फुट उंच उडून खाली पडल्‍याने झालेल्‍या अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाल्‍याची घटना रविवारी (ता. 7) दुपारी घडली आहे.

येथे संगमेश्वर मंदिरामध्ये एका धार्मिक कार्यक्रमाची सांगता होती. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता येथे फेरीवाले, आकाशपाळणेवाले, धार्मिक साहित्‍य विक्री करणारे व्यावसायिक आले होते. लहान मुलांच्‍या मनोरंजनासाठी मिकी माऊस हा बलून देखील उभारण्यात आला होता. 

दरम्‍यान, आज दुपारी दिडच्‍या सुमारास मिकी माऊसच्‍या बलूनमध्ये पाच मुले खेळत होती. यावेळी अचानक वादळी वारे आले. या वादळी वाऱ्यामुळे मिकी माऊसचा बलून जमिनीपासून सुमारे चाळीस फूट उंच उडाला. यामुळे बलूनमध्ये खेळणारी मुले घाबरून गेली. तर बलूनमधील हवा निघून गेल्‍यामुळे हा बलून जमिनीवर आदळला. या अपघातात मनोहर राघोजी मोरे (वय 10) याचा मृत्‍यू झाला तर त्‍याचा भाऊ प्रवीण राघोजी मोरे (वय 12), शिवाजी देविदास जहराव (वय 12), करण रमेश धुळे (वय 13), दिगंबर माधव बर्वे (वय सात) हे गंभीर जखमी झाले. दरम्‍यान, गावकऱ्यांनी बलूनच्‍या मागे धाव घेतली. अपघातामधील जखमींना उपचारासाठी तातडीने वाशिम येथे नेण्यात आले आहे. या अपघातातील दिगंबर बर्वे हा त्‍याच्‍या कुटूंबियासोबत धार्मिक कार्यक्रमासाठी आला होता तर इतर चार मुले एका वसतीगृहात राहतात. या घटनेनंतर मिकी माऊस बलून चालकाने घटनास्‍थळावरून पळ काढला. घटनास्‍थळी गोरेगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधाकर आडे, जमादार मधुकर राठोड, श्री. महल्‍ले यांच्‍या पथकाने भेट देवून पाहणी केली

Web Title: major accident because of mickey mouse balloon in hingoli

टॅग्स