जिल्हा परिषदेत बहुमतासाठी सहा तालुके राहणार "किंग'

शेखलाल शेख - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑगस्ट 2016

औरंगाबाद - जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीची गण संख्या जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गट, गण आरक्षण होईल तेव्हा कोणता उमेदवार द्यायचा यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून आतापासूनच उमेदवारांच्या नावांची शोधाशोध सुरू झाली आहे. नवीन वर्षात होणाऱ्या निवडणुकीतील 62 सदस्यांपैकी 31 सदस्य महिला राहणार असल्याने महिला उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. 

औरंगाबाद - जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीची गण संख्या जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गट, गण आरक्षण होईल तेव्हा कोणता उमेदवार द्यायचा यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून आतापासूनच उमेदवारांच्या नावांची शोधाशोध सुरू झाली आहे. नवीन वर्षात होणाऱ्या निवडणुकीतील 62 सदस्यांपैकी 31 सदस्य महिला राहणार असल्याने महिला उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. 

येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक गण असलेल्या औरंगाबाद, पैठण, गंगापूर, सिल्लोड, कन्नड, वैजापूर तालुक्‍यांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहणार आहे. या सहा तालुक्‍यांतून 52 सदस्य असल्याने बहुमतासाठी किमान 32 सदस्यांच्या आकड्यात हे तालुके "किंगमेकर‘ ठरणार आहेत, तर उर्वरित तीन तालुक्‍यांत फक्त दहा सदस्य आहेत. त्यातच औरंगाबाद, पैठण, गंगापूरमध्ये एकूण 28 सदस्य असल्याने या तालुक्‍यांनाही खूप महत्त्व राहणार आहे. 

सहा तालुक्‍यांतील नेत्यांना राहणार महत्त्व 

जिल्हा परिषदेत नवीन गटानुसार औरंगाबाद, पैठण, गंगापूर, सिल्लोड, कन्नड आणि वैजापूर तालुक्‍यांत सर्वाधिक 52 सदस्य असल्याने या तालुक्‍यांतील आमदार आणि स्थानिक नेत्यांना अतिशय महत्त्व प्राप्त होणार आहे. मागील निवडणुकीत जिल्ह्यात कॉंग्रेस एकूण 15 आणि राष्ट्रवादीचे 10 सदस्य निवडून आलेले आहेत. शिवसेनेचे सर्वाधिक अठरा सदस्य आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापासूनच शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मोठ्या गावातून कोणता तगडा उमेदवार राहील यासाठी शोधाशोध सुरू झालेली आहे. त्यातच औरंगाबाद, पैठण आणि गंगापूर तालुक्‍यात सर्वाधिक तब्बल 28 सदस्य राहणार असल्याने या तीन तालुक्‍यांना बहुतमासाठी खूप महत्त्व राहणार आहे. 

 

एससी, एसटी, ओबीसींचे 28 सदस्य 

जिल्ह्यात नवीन गटानुसार एससीसाठी 8 गट राहतील. पैकी 4 महिलांसाठी, एस.टी.साठी 3 गट त्यापैकी 2 गट महिलांसाठी, तर ओबीसीसाठी 17 गट त्यापैकी 9 गट महिलांसाठी आहेत. नवीन जिल्हा परिषदेत तब्बल 28 सदस्य हे आरक्षित गटातून राहतील. त्यामुळे राजकीय पक्षाकडून वैध जातप्रमाणपत्र असलेल्या तगड्या उमेदवारांची यादी तयार केली जात आहे. गट आरक्षित झाला तर तेथून त्या प्रवर्गाचा उमेदवार कोणता राहील यासाठी आतापासूनच गटात चर्चा सुरू आहे. 

 

पंचायत समित्या ताब्यात ठेवण्याची तयारी 

पाच तालुक्‍यांतील जिल्हा परिषद गटासोबत मोठ्या पाच पंचायत समित्या ताब्यात ठेवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना शक्ती पणाला लावावी लागणार आहे. प्रत्येक तालुक्‍यातील राजकीय स्थिती, स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव असल्याने पंचायत समित्यांच्या 124 सदस्यांसाठी राजकीय पक्षांकडून इच्छुकांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. नवीन वर्षात होणाऱ्या निवडणुकीत औरंगाबाद पंचायत समितीमध्ये सर्वाधिक 20, पैठण 18, सिल्लोड 16, कन्नड 16, तर वैजापूर 16 सदस्य राहतील. त्यामुळे या तालुक्‍यांतील आमदारांचासुद्धा या निवडणुकीत कस लागणार आहे. 

 

कॉंग्रेस-राष्ट्रवादीसमोर आव्हान 

जिल्हा परिषदेत सध्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि मनसे यांची आघाडी असलेला पॅटर्न आहे. आता बदललेल्या राजकीय परिस्थितीत सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान कॉंग्रेस-राष्ट्रवादीसमोर आहेत. शिवाय आघाडी आणि युती होईल का, यावरही बरीच गणिते अवलंबून राहणार आहेत. 

 

तालुके..........जिल्हा परिषद गट........पंचायत समिती गण 

सोयगाव..............3....................................6 

सिल्लोड..............8...................................16 

कन्नड..................8..................................16 

फुलंब्री...............4..................................8 

खुलताबाद..........3...................................6 

वैजापूर...............8...................................16 

गंगापूर................9..................................18 

औरंगाबाद...........10.................................20 

पैठण................9...................................18 

Web Title: A majority of the District Conference will be the six counties "King"