कुंभाराचा आवा लुटण्यासाठी कुंभारगल्लीत आज होणार गर्दी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

औरंगाबाद - कुंभारगल्लीत आव्यावर सुरई, माठ, रांजण, कुंड्या, गाडगी, मडकी, झाकण्या, पणत्या रचण्याची लगबग सुरू आहे. निमित्त आहे मकरसंक्रांतीचे. शनिवारी (ता. 14) सकाळपासून सुवासिनी गटागटाने वाजतगाजत येऊन कुंभाराने भट्टीत भाजलेल्या मडक्‍यांच्या राशीचे पूजन करून वाण लुटतील.

औरंगाबाद - कुंभारगल्लीत आव्यावर सुरई, माठ, रांजण, कुंड्या, गाडगी, मडकी, झाकण्या, पणत्या रचण्याची लगबग सुरू आहे. निमित्त आहे मकरसंक्रांतीचे. शनिवारी (ता. 14) सकाळपासून सुवासिनी गटागटाने वाजतगाजत येऊन कुंभाराने भट्टीत भाजलेल्या मडक्‍यांच्या राशीचे पूजन करून वाण लुटतील.

संक्रांतीला मातीच्या सुगड्यांमधून वाण देण्याघेण्याची परंपरा आहे. त्यानिमित्त महिला विविध वस्तूंची वाणे लुटतात. मात्र, एकदातरी "कुंभाराचा आवा' लुटावा, असे सुवासिनीला वाटत असते. थोडे खर्चिक असले, तरी अनेक महिला सामूहिकरित्या हा कार्यक्रम करतात. बेगमपुरा भागात जुन्या काळापासून वसलेल्या कुंभारगल्लीत जागोजाग माठ, रांजण, कुंड्या, गाडगी, मडक्‍यांच्या राशी लागल्या आहेत. अगोदरच बुकिंग करून ठेवल्यानुसार शनिवारी सकाळी साडेदहापासून महिला गटागटाने येऊन आवा लुटतील, असे गणेश जोबले यांनी सांगितले.

सात हजारांपर्यंत खर्च
आवा लुटण्यासाठी दोन हजारांपासून सात हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. महिला आपल्या गटातील सवाष्णींच्या संख्येनुसार वस्तूंची ऑर्डर देतात. त्यानुसार आवा रचला जातो. त्यात चूल, बोळक्‍यांबरोबरच तवली, झाकणी, काथवट, डेग, केळी, अशा आजकाल सहसा पहायला न मिळणाऱ्या वस्तूंना महिलांची पसंती असते, असे सविताबाई जोबले यांनी सांगितले.

सुगडांची विक्री जोरात
गल्लीत सकाळपासून सुगडे विकण्यासाठी बसलेल्या समाबाई म्हणाल्या, 'संक्रांत उद्या असली, तरी आजच घरोघर वाणवसा, सुघड आणले जातात. पाच लहान, पाच मोठी सुगडी आणि एक पणती, असे वाणाचे साहित्य 20 रुपयांना विकले जात आहे. उद्या सकाळपर्यंत याची विक्री चालेल. त्यानंतर महिला आवा लुटायला येतील. काल छावणीच्या आठवडे बाजारात दुकान लावले, त्यात मोठी विक्री झाली.''

काय असतो हा आवा?
संक्रांत हा सुवासिनींचा सण. एकमेकींना सौभाग्याचे वाण देताना संसारोपयोगी वस्तूंची भेट दिली जाते. यातच जुन्या काळापासून हळदी-कुंकवाच्या राशी, कुंभाराचा आवा, कासाराचा आवा लुटण्याचीही पद्धत आहे. महिला वाजतगाजत येऊन आव्यात भाजलेल्या मडक्‍यांची रास पूजतात. कुंभाराचा आवा (भट्टी), चाक, दांडा, चोपणीची पूजा करतात. कुंभाराला सहकुटुंब आहेर केला जातो. त्याच्या पत्नीला मणीमंगळसूत्र, जोडवे असे सौभाग्यालंकार दिले जातात. बांधून आणलेला शिधाही दिला जातो. त्यानंतर सर्व महिला त्या भट्टीत रचलेल्या कुंड्या, माठ, रांजणापासून सर्व वस्तू लुटून नेतात.

Web Title: makar sankrant celebration