मकर संक्रांत विशेष : कशासाठी आहे हा सण वाचा सविस्तर

प्रमोद चौधरी
बुधवार, 15 जानेवारी 2020

एकमेकांमध्ये स्नेह, प्रेम, जिव्हाळा वाढविणारा मकर संक्रांतीचा सण बुधवारी (ता.१५ जानेवारी २०२०) सर्वत्र साजरा होत आहे. त्यासाठी नांदेडमधील बाजारपेठ उपयोगी भेटवस्तूंनी सजली असून, खरेदीसाठी महिलांची गर्दी होतांना दिसत आहे.

नांदेड : भारतीय सणांचे वैशिष्ट्यच आपापल्या परीने मोठा आणि महत्त्वाचा तर आहेच; सोबतच आनंदाची, स्नेहाची मनमुराद पखरण करणाराही आहे. भारतीय सण म्हणजे केवळ रुढी, परंपरा यांना जखडलेले उत्सव नाहीत तर ज्ञान, विज्ञान, निसर्ग, आरोग्य, आयुर्वेद यांचा तो एक अपूर्व मेळ असतो. 

एकमेकांमध्ये स्नेह, प्रेम, जिव्हाळा आणि एकोपा वाढावा हा मकरसंक्रांती सणाचा संदेश आहे. म्हणूनच ‘तिळगुळ घ्या गोड बोला’ असे या दिवशी आवर्जून म्हटले जाते. आता तिळगुळ का? आणि या सणाचे नाव ‘मकर-संक्रांत’च का? या प्रश्‍नांची उत्तरे समजून घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. मकरसंक्रांतीचा सण दरवर्षी १४ जानेवारीलाच येतो. परंतु, यावर्षी तो १५ जानेवारी रोजी आला आहे.

Image may contain: 6 people
मंगळवारी भेटवस्तू खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली होती. (छायाचित्र ः सचिन डोंगळीकर

अशी आहे संक्रांतीची कथा
पौराणिक कथानुसार जगदंबेने या दिवशी संकरासुराला ठार मारले म्हणून तिला ‘संक्रांती’ हे नाव पडले. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत किंवा करिदिन अशा तीन दिवसांत हा सण विभागलेला आहे. आहारशास्त्रानुसारही संक्रांतीला खूप महत्त्व आहे. जानेवारी महिन्यातील थंडीच्या दिवसात शरीर कोरडे, रखरखीत आणि रुक्ष बनलेले असते. त्वचेला आणि शरीराला स्निग्ध, पौष्टिक आहाराची गरज असते. म्हणून या प्रकारे शरीराला बळ आणि स्निग्धता देणारा भरपूर पौष्टिक आहार घेतला जातो. स्निग्धता आणि उष्णता निर्माण व्हावी म्हणून तिळाचा आहारात जास्तीत जास्त वापर केला जातो.

Image may contain: 6 people, people sitting, people eating, table and food
नांदेडच्या बाजारपेठेत दाखल झालेले तीळ-गुळाचे विविध प्रकार (छायाचित्र ः सचिन डोंगळीकर)

संक्रांतीकाळातले असे आहे वैशिष्ट्य
संक्रांतीकाळातले वैशिष्ट्य असे की, याकाळात आकाश निरभ्र असते. हवा आल्हाददायक आणि वेगवान असते. पतंग उडवण्यासाठी असे वातावरण म्हणजे एक पर्वणीच असते. संक्रांतीच्या काळात आकाश वेगवेगळ्या रंगाच्या आणि आकारांच्या पतंगांनी सजलेले असते. अनेक ठिकाणी ‘काईट फेस्टिवल’ही आयोजित केले जातात. मांजा, फिरकी आणि पतंग यांची जणू चढाओढ सर्वत्र सुरु असते. संक्रांतीचं महत्त्व आहे ते एकमेकांबद्दलचा जिव्हाळा, स्नेह निर्माण करण्याचे.

हेही वाचानांदेडलाच व्हावे विज्ञान केंद्र : कशासाठी ते वाचाच
 
खासकरून स्त्रियांचा सण
संक्रांत हा खासकरून स्त्रियांचा सण आहे. संक्रांतीच्या दिवशी घरोघरी स्त्रिया हळदीकुंकवाचा समारंभ आयोजित करतात. मैत्रीची खूण म्हणून तिळगुळासोबत एखादे सुवासिक फुल, गजरा आणि उपयोगी भेटवस्तू देतात. आजकाल मकरसंक्रांतीच्या कितीतरी दिवस आधी वेगवेगळ्या सुंदर, स्वस्त पण उपयुक्त वस्तूंनी बाजार फुलून गेलेला असतो.
 
भेदाभेद दूर करणारा सण
आजकाल वृद्धाश्रम, अनाथाश्रम, तुरुगांतील कैदी, अंध-अपंग विद्यालये या ठिकाणी संक्रांतिनिमित्त तिळगुळ वाटपाचे कार्यक्रम करून या घटकांना ते एकटे नाहीत तर सारा समाज तुमच्यासोबत आहे, असा विश्‍वास देण्याचा स्तूत्य उपक्रम अनेक संस्थांतर्फे राबवला जातो. जाति-धर्म-गरीब-श्रीमंत असे सर्व भेद दूर करणारा मकरसंक्रांतीचा सण असतो.

हे देखील वाचलेच पाहिजे‘ढवारा’ जपत होता ऋणानुबंध : काय आहे ढवारा ते वाचा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Makar Sankranti Special: Read this festival for details