ठणठणीत तब्‍येतीसाठी करा सुर्यनमस्‍कार

राजेश दारव्‍हेकर
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

 

-शहरातील विविध नगरात मागच्या काही दिवसांपासून योगवर्ग सुरू

हिंगोली ः सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ठणठणीत तब्‍येतीसाठी व्यायामाला विशेष महत्‍व आहे. याकरिता सुर्यनमस्‍कार केल्यास दिवसभरातील ताणतणाव कमी होऊन तब्येत ठणठणीत ठेवण्यास मदत होते. दररोज पाच ते बारा सुर्यनमस्‍कार करणे गरजेचे आहे. 

शहरातील विविध नगरात मागच्या काही दिवसांपासून योगवर्ग सुरू झाले आहेत. येथे प्राणायामसह विविध आसने व सुर्यनमस्‍काराबाबत मार्गदर्शन व प्रत्‍यक्ष प्रात्‍यक्षीके करून दाखविली जात आहेत. योगवर्गात येणाऱ्या साधकाची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यात गंगानगर, वैभवनगर, विद्यानगर, सरस्‍वतीनगर, रिसाला बाजार, एनटीसी आदी ठिकाणी योगवर्ग सुरू आहेत. यात मोठ्या प्रमाणावर महिला व पुरूष सहभागी झाले असून ते योगाचे धडे घेत आहेत. येथे योग शिक्षक योगाबद्दल माहिती देवून त्‍याचे महत्‍व सांगून साधकांकडून प्रात्‍यक्षीके देखील करून घेत आहेत. 

यासाठी आवश्‍यक सुर्यनमस्कार
पोटात जठर, यकृत, प्लीहा, स्वादुपिंड, लहान आतडे, मोठे आतडे, मुत्रपिंड हे अवयव आहेत. यातील लहान आतड्याची लांबी २२ फूट आहे. ज्याप्रमाणे फुगेवाला नळीचा फुगा पंपाने हवा भरतो. त्या प्रमाणे अन्नाचा घास जेंव्हा येतो तेव्हा आतड्याचा व्यास वाढतो ते प्रसरण पावते आणि घास पुढे गेला की आकुंचन पावते. म्हणजे अन्न पुढे पुढे सरकणे व  न पचलेले अन्न शरीराबाहेर  पडणे ह्यासाठी आतड्याचे आकुंचन व प्रसरण होणे आवशक आहे. या क्रियेत पोट एकदा दाबले जाणे व ताणले जाणे आवशक आहे. नुसत्या चालण्याने ते होत नाही. सुर्यनमस्कारात मात्र ते होते.

असे करावे सुर्यनमस्कार 
सुर्यनमस्कारात प्रथम खाली वाकावे, तेव्हा पोट दाबले जाते. त्‍यानंतर डावा पाय दुमडून व उजवा पाय मागे न्यावा. तेव्हा पोटाचा डावा भाग दाबला जातो व उजवा भाग ताणला जातो. नंतर ओणवे होतो तेव्हा पोट सरळ होते. नंतर ह्या स्थितीत धडाचा भाग वर करून आकाशाकडे पाहतो, तेव्हा पोट ताणले जाते. नंतर उठताना उजवा पाय पुढे घेतो तेव्हा पोटाचा उजवा भाग दाबला जातो व डावा भाग ताणला जातो नंतर वाकलेल्या स्थितीत आपले पोट दाबले जाते. या क्रमाने पोट दाबले व ताणले जाते. अशा प्रकारे हा व्यायाम करावा. 

पोटातील अवयव व्यवस्थित काम करू लागतात
पोटातील अवयव व्यवस्थित काम करू लागतात. अन्न नीट पचते, शरिरास त्‍याचा चांगला लाभ होतो. सकाळी पाच ते १२ नमस्कार घातले तर दमायला होत नाही. रात्रीपर्यंत फ्रेश राहून दिवस उत्साहात जातो. यामुळे तब्येत ठणठणीत ठेवण्यासाठी सुर्यनमस्‍कार करणे गरजेचे आहे. -सुनील मुळे, योगशिक्षक.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make a sunrise for the sick