मामाचे सीमकार्ड अन्‌ भाच्याची अश्‍लील चित्रफीत, आता दोघे कस्टडीत! बीड जिल्ह्यातील...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

मामाचे सीमकार्ड वापरून भाच्याने लहान मुलांचे बनविलेले अश्‍लील व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल केल्याचा प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक करून अंबाजोगाईच्या न्यायालयासमोर उभे केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अंबाजोगाई (जि. बीड) - भाच्याने मोबाईलवर अश्‍लील चित्रफीत बनविली आणि मामाचे सीमकार्ड घेऊन प्रसारित केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या असून, न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. 

या प्रकरणाची माहिती अशी : सदरील चित्रफीत ही परळी येथून व्हायरल करण्यात आली. त्याचा तपास करताना आरोपी सोहम देवीलाल जाट याने त्याचे मोबाईलचे सीमकार्ड त्याचा भाचा प्रकाशचंद्र जाट यास वापरण्यास दिले. मात्र, या कार्डवरून प्रकाशचंद्रने अल्पवयीन मुलाची अश्‍लील चित्रफीत फेसबुक व मोबाईलवरून व्हायरल केल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा - निर्बल पुरुषांनाही कसा होतो कच्च्या केळीचा फायदा, वाचा...

लहान मुलांची अश्‍लील चित्रफीत व्हायरल केल्याचा तपास करण्याबाबत पोलिस उपमहानिरीक्षक श्री. बैजल यांनी बीडच्या पोलिस अधीक्षकांना पत्राद्वारे आदेश दिला. या प्रकरणात आरोपींविरुद्ध परळी शहर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदा व बाललैंगिक अत्याचार कायद्याअन्वये गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा - बीड क्राईम-प्रतिकार करणाऱ्या मुलावर चोरट्याकडून चाकूचे सपासप वार

सायबर सेलच्या प्रभारी पोलिस उपनिरीक्षक कोमल शिंदे व परळी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक एस. पी. कदम यांनी दोन्ही आरोपींना रविवारी (ता. दोन) जिल्हा व सत्र न्यायाधीश माहेश्‍वरी पटवारी यांच्यासमोर हजर केले.

हेही वाचा - बीड जिल्ह्यात परिवर्तन पतसंस्थेच्या दोन संचालकांना बेड्या

न्यायालयाने दोघा आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अशोक कुलकर्णी यांनी काम पाहिले. यातील आरोपी सोहम (महाराज) हा अंबाजोगाई व बीडमध्ये आचारी म्हणून काम करतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mama-Bhache In The Beed District In Police Custody