माणुस व झाड, 'ढोलीतला बाबा'

माणुस व झाड, 'ढोलीतला बाबा'

रस्त्यावरील वडाच्या झाडाच्या ढोलीतुन बाहेर फक्त हात येते... रस्त्यावरुन जाणाऱ्या प्रवाश्‍यांकडून काहीतरी मिळेल या आशेने.... तेवढ्यात एक रिक्षा थांबते. रिक्षातुन उतरलेली महिला प्लॅस्टिकच्या पिशवीतील शिळ्या भाकरी-पोळ्या देते, आणि काही नाणी पण... नंतर दुचाकीवरुन एक युवक येतो पाठीवरील सॅकमधुन एक डाळिंब देतो..... झाडाच्या ढोलीत बसलेल्या वृध्दाच्या चेहऱ्यावर हसु उमलते...... कितीतरी दिवसातुन त्याने आज फळ पाहिलेले असते.....तेवढ्यात झोकांड्या खात खांद्यावर भंगाराचं पोते घेतलेला, दाडी वाढलेला तरुण जवळ येतो, "ये थेरड्या, आहे का खायला काय?‘‘ असं म्हणतो. बाबाने हात वर करुन जाण्याचा इशारा करताच पुढे निघतो...

पेठ रोडवरील एका भल्या मोठ्या वडाच्या झाडाच्या ढोलीत भावडू जाधव हा वृध्द सात वर्षांपासुन राहात आहे. 65 ते 70 वयाचा हा "ढोलीतला बाबा‘. मुळचा गुजरात राज्यातील धरमपुर (जि. बलसाड) मधल्या बहिरमपाडा येथील. बायको रक्‍मीला घेऊन जगण्यासाठी नाशिकला आला. त्यावेळी नाशिकच्या अमरधाममध्ये लाकडे फोडण्याचे काम मिळाले. त्यावर गुजराण चालायची. तिन दगडाच्या चुलीवर रक्‍मी नागलीची भाकर बनवायची तर भावडू त्या भाकरी भाजू लागायचा. पोटी मुलबाळ नसल्याने ते दोघेच राहात होते. पुढे काम होईना मग मागुन आणलेल्या अन्नावरच गुजरान चालायची. कित्येक दिवस गेल्यावर रक्‍मीच्या डोळ्यात फुल पडले ती अंध झाली मागायला जाणं बंद झाले उपासमार होवु लागली. एका रात्री रक्‍मी निघुन गेली आगदी न येण्यासाठी. कोणाच्यातरी सांगण्यावरुन सकाळी महापालिकेची पांढरी गाडी आली त्यात रक्‍मीचं प्रेत ठेवलं होतं. अंत्यसंस्कारासाठी भावडूलापण नेण्यात आले. परत येईपर्यंत रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडीतील सर्व वस्तू, भांडी गायब. भंगारवाल्यानी होती नव्हती ती भांडी, कपडे सर्व नेलं. आगदी झोपडीची लाकडंसुध्दा, अन्‌ तिथंच बिऱ्हाड उडून गेले होतं. तेव्हापासुन भावडू या जवळच्या झाडाच्या ढोलीतच राहातोय. 

हे झाड त्याला ऊन, वारा पाऊस या पासुन सांभळत आहे. परिसरातील मुले त्याला "ढोलीतला बाबा‘ या नावानेच ओळखतात. आता त्याचा कमरेखालचा भाग चालत नाही. नारुमुळे पाय गेले असं तो सांगतो, वृध्द झाल्याने तो त्या ढोलीतच दिवस- रात्र बसुन असतो. जवळच राहाणारा तुळशीराम आंग्रे कधीतरी बाटलीत पाणी, भाकर, चटणी आणुन देतो. काही गरज पडल्यास मदतही करतो. मदत करणारे ढोलीवाल्या बाबाच्या पाठीशी उभे राहात असतांना, त्याला त्रास देणारेही कमी नाहीत. बऱ्याचदा परिसरातील दारुडे येऊन त्याझ्याचकडील पैसे, कपडे, अन्न हिसकावुन नेतात. खेळायला आलेली मुलं वस्तु पळवतात, चेष्ठा करतात. गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसात ढाबळी, चादर, गोदडी, पैसे सर्वच वाहु गेले. सध्या पांघरायला पोतं, अंथरायला फाटकं ढाबळ, एक वाटी, एक काठी एवढाच काय तो "ढोलीतल्या बाबाचा‘ संसार आहे. 

काल मध्यरात्री गुजरातहुन आलेला भरधाव ट्रक या वडाच्या झाडावर आदळला, बाबा थोडक्‍यात बचावला. उतरत्या वयात मरणाच्या दाराजवळ पोहोचलेल्या या भावडूला गावाकडच्या त्याच्या बारा गुंठे जमिनिची आठवण येते. भावडूच्या लग्नाआधी रक्‍मीला पहिल्या नवऱ्याचं एक मुल होतं त्याचं नाव लक्ष्मण. पदराखाली आलेल्या लक्ष्मणला लहानाचे मोठे केले. पण त्यानं भावडूच्या घरावरची कौलं काढुन नेली, दुसरं घर केलं, गावातुन हाकलुन दिलं, जमीनही अतिक्रमणात गेल्याने पोटापाण्याठी नाशिकला यावे लागले. आणि आता मला कोठेही जायचे नाही, मला कोणाचे घरी ही राहायचे नाही. असे म्हणतच तो उरलेले शेवटचे जीवन झाडाच्या ढोलीतच कंठत आहे. कित्येक दिवसांपासुन अंघोळ नाही, केस वाढलेले तरीही आवाजात कणखरपणा असलेल्या माणुसकीला पारखा झालेल्या या "ढोलीतल्या बाबाला‘ या समाजात फक्त झाडाचाच आधार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com