बहिरी ससाणा विक्रीला ठेवणाऱ्या तरुणास अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

पक्ष्यांच्या प्रजातीतील शिकारी म्हणून ओळखला जाणारा दुर्मिळ बहिरी ससाणा विक्रीसाठी दुकानात ठेवणाऱ्या खान मुन्तजीब आलम खान यास 14 दिवसांची
न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वन विभागाने बुधवारी (ता. सात) रात्री ही कारवाई केली होती. 

औरंगाबाद - पक्ष्यांच्या प्रजातीतील शिकारी म्हणून ओळखला जाणारा दुर्मिळ बहिरी ससाणा विक्रीसाठी दुकानात ठेवणाऱ्या खान मुन्तजीब आलम खान यास 14 दिवसांची
न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वन विभागाने बुधवारी (ता. सात) रात्री ही कारवाई केली होती. 

डीडीटी या कीटकनाशकाच्या मोठ्या प्रमाणावरील फवारणीमुळे एकेकाळी धोक्‍यात आलेला बहिरी ससाणा (शास्त्रीय नाव ः फाल्को पेरेग्रीनस) भारतात अतिशय दुर्मिळ पक्षी आहे. गडद हिरव्या रंगाचे टोकदार पंख, चपळ शरीर व अतिशय वेगवान हालचाली करून उडणाऱ्या पक्ष्यांची शिकार करण्यात पटाईत असलेल्या या पक्ष्याला पकडणे, विक्री करणे हा वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत अजामीनपात्र गुन्हा आहे. 

पैठण गेट परिसरातील फेदर्स न्‌ फिन्स या दुकानात हा पक्षी विक्रीसाठी ठेवल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. तांबे, वन परिमंडळ अधिकारी एस. बी. चव्हाण यांनी पथकासह छापा टाकून पक्षी ताब्यात घेतला. दुकानमालक खान मुन्तजीब आलम खान (रा. देवडीबाजार, रोहिलागल्ली) यास अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यास न्यायालयाने गुरुवारी (ता. आठ) एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. शुक्रवारी (ता. नऊ) त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावत त्यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man selling Duck Hawk is behind bars