मांजरा धरणाचा डावा कालवा फुटून पिकांचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

अंबाजोगाई - तालुक्‍यातील माकेगाव येथे बुधवारी (ता. 21) पहाटे मांजरा धरणाचा डावा कालवा दुरुस्तीअभावी फुटून शेतकऱ्यांच्या पिकांत पाणी शिरले; तर काही पाणी होळणा नदीत गेल्याने उन्हाळ्याच्या पूर्वसंध्येस नदी खळाळून वाहिली. या पाण्यामुळे शेतात काढून ठेवलेल्या हरभऱ्याच्या पिकांचेही नुकसान झाले. 

अंबाजोगाई - तालुक्‍यातील माकेगाव येथे बुधवारी (ता. 21) पहाटे मांजरा धरणाचा डावा कालवा दुरुस्तीअभावी फुटून शेतकऱ्यांच्या पिकांत पाणी शिरले; तर काही पाणी होळणा नदीत गेल्याने उन्हाळ्याच्या पूर्वसंध्येस नदी खळाळून वाहिली. या पाण्यामुळे शेतात काढून ठेवलेल्या हरभऱ्याच्या पिकांचेही नुकसान झाले. 

मांजराचा डावा कालवा अंबाजोगाईसह लातूर तालुक्‍यातील महापूरपर्यंत जातो. या कालव्याला आठ दिवसांपूर्वीच पाणी सोडले होते. चार वर्षांनंतर पाणी सोडताना पाटबंधारे विभागाने या कालव्याची दुरुस्ती करणे आवश्‍यक होते. या कालव्यात वेड्या बाभळी व इतर झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली होती; परंतु ही झुडपे न काढताच कालव्यात पाणी सोडण्यात आले. वाढलेल्या झुडपांमुळे कालवा खचला होता. पाणी सोडताच माकेगाव शिवारात बुधवारी पहाटे हा कालवा फुटला. त्यामुळे हे पाणी जवळच्या श्री. विरगट यांच्या शेतात घुसले. या शेतकऱ्याने हरभऱ्याचे पीक काढून ठेवले होते. हे पीक कालव्याच्या पाण्यात तरंगू लागले. काही पाणी होळणा नदीत गेल्याने नदीही खळाळून वाहिली. 

हा कालवा फुटल्याची माहिती माकेगाव येथील कॉंग्रेसचे नेते राजेसाहेब देशमुख यांना त्यांच्या सालगड्याने दिली. श्री. देशमुख यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून या भागातील अभियंता श्री. मुळे यांना माहिती दिली. त्यामुळे धरणातून सोडलेले पाणी बंद करण्यात आले. हे पाणी तसेच राहिले असते तर मोठ्या प्रमाणात पाणी नदीला वाहून गेले असते. 

दुष्काळात पाण्याचे महत्त्व काय असते ते सर्वांना माहीत झाले आहे; परंतु यंदा धरण भरले, मात्र पाण्याच्या नियोजनाअभावी पाण्याचा अपव्यय होत आहे. 

शाखा अभियंत्यांना विचारा... 
पाटबंधारे विभागाने याबाबत पाणी सोडण्यापूर्वी कालव्याची तपासणी का केली नाही. केली असेल तर कालवा खचल्याचे का लक्षात आले नाही. याबाबत उपअभियंता श्री. जोशी यांना विचारले असता कालवा फुटला नव्हे, खचला होता; परंतु तो कोणत्या ठिकाणी फुटला ते माहीत नाही, ते शाखा अभियंत्यांना विचारा असे उत्तर त्यांनी दिले. 

Web Title: mandram dam Left canal has broken

टॅग्स