सासर-माहेर सुखावणारा खेळ ‘मंगळागौर’; महिलांना लागले वेध

प्रमोद चौधरी
रविवार, 29 जुलै 2018

श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे’ अशा प्रफुल्लित वातावरणात श्रावणातली मंगळागौर येते. हा एकप्रकारे सासर-माहेर सुखावणारा पारंपरिक खेळ.

नांदेड - श्रावण हा धार्मिक व्रत-वैकल्यांचा पवित्र महिना. १२ आॅगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. ‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे
चोहीकडे’ अशा प्रफुल्लित वातावरणात श्रावणातली मंगळागौर येते. हा
एकप्रकारे सासर-माहेर सुखावणारा पारंपरिक खेळ. त्याला धार्मिक व
सांस्कृतिक अशी दोन अंगे असून नांदेड शहरामध्ये पाच-सहा ग्रुप्स आहेत.
सर्व ग्रुप्सनी जोरदार सराव सुरु केला आहे.

‘शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून...किंवा ‘आकाशात चमकततात तारे,
जमिनीवर चमकतात हिरे’ अशा मनोरंजक उखाण्यांसह ‘शेजीबाईचा कोंबडा आला माझ्या दारी’, ‘कशी मी नाचू’?, ‘माझ्या पाटल्या काय गं केल्यास’, ‘आगोटा पागोटा’ अशा विविध गाण्यांतून संसारातील सुख-दुःख मांडणारा खेळ म्हणजे मंगळागौरीचे खेळ. परंतु, ‘करिअर’ करण्याच्या नादामध्ये हे खेळ आजच्या बऱ्याचशा मुलींना खेळता येत नाहीत आणि माहितही नाहीत. एकंदरितच ‘सरलं जुनं’ या पठडीमध्ये हे खेळ टाकले गेले आहेत. वास्तविक पहाता श्रावण महिन्यात विविध व्रत-वैकल्यं असतात. नववधूंसाठी हा महिना खूपच महत्त्वाचा; कारण याच महिन्यात येणारी मंगळागौर ही नववधूंसाठी नवी ऊर्जा देणारी असते. एकंदरीतच, सासर-माहेर सुखावणारा हा खेळ असल्याने त्याची जोपासना करण्यासाठी नव्या पिढीतील मुली तसेच नवविवाहितांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे, असे मत शिवविजय कॉलनीतील सुवासिनी क्रिएटिव्ह ग्रुपच्या अंजली देशमुख यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
 

Web Title: Mangalagaur at nanded