पळणारा तो सापडलाच...सीसीटीव्हीत अन्‌ पोलिसांच्या तावडीतही 

मनोज साखरे
मंगळवार, 16 जुलै 2019

पहाटे एकट्या-दुकट्या महिलेला अंगण झाडताना लक्ष्य करायचे, तिच्या मागून येत दागिना हिसकावून पळून जायचे अशी मोडस वापरणारा चोर दागिने हिसकावताना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाला अन्‌ याच सीसीटीव्ही फुटेजच्या जोरावर दुसऱ्याच दिवशी पोलिसांच्याही तावडीत तो अलगद सापडला. त्याला गुन्हे शाखा पोलिसांनी सोमवारी (ता. 15) बेड्या ठोकल्या. 

औरंगाबाद - पहाटे एकट्या-दुकट्या महिलेला अंगण झाडताना लक्ष्य करायचे, तिच्या मागून येत दागिना हिसकावून पळून जायचे अशी मोडस वापरणारा चोर दागिने हिसकावताना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाला अन्‌ याच सीसीटीव्ही फुटेजच्या जोरावर दुसऱ्याच दिवशी पोलिसांच्याही तावडीत तो अलगद सापडला. त्याला गुन्हे शाखा पोलिसांनी सोमवारी (ता. 15) बेड्या ठोकल्या. 

हडको एन-11 परिसरात अंगण झाडणाऱ्या लक्ष्मी बोराडे (वय 65, रा. एन-11, हडको) व जवळच्याच सुदर्शननगरातून अशाच पद्धतीने संजीवनी इपारे (25) यांचे दागिने हिसकावून पंचविशीतील चोराने पोबारा केला होता. 12 जुलैला पहाटे सहाच्या सुमारास या घटना घडल्या. या प्रकरणात लक्ष्मी बोराडे (65, रा. एन-11, हडको) यांनी तक्रार दिली. त्यात गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलिस चोराच्या मागावर होते. तो सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात दिसल्याने त्यांचेही काम सोपेच झाले. त्याच्या वर्णनावरून एका पोलिस कर्मचाऱ्याने झटकन त्याला ओळखले आणि पटकन त्याला पोलिसांनी ताब्यात घेत अटकही केली. राजेंद्र चंडोल (26, रा. जनुना, ता.जि. बुलडाणा) असे संशयिताचे नाव आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 
 
बुधवारपर्यंत पोलिस कोठडी 
संशयित चोराला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता बुधवारपर्यंत (ता.17) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. एच. जोशी यांनी दिले. सहायक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी युक्तिवाद केला. 
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mangalasutra Thief arrested in Aurangabad