मांजरा धरणावरूनच जिल्हाधिकाऱ्यांचे पाणी बचतीचे आवाहन (व्हिडिओ)

विकास गाढवे
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

मांजरा धरणात बुधवारी (ता. 30) सकाळी आठ वाजेपर्यंत 34 दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणी आले आहे. चोवीस तासात दोन दलघमी पाणीसाठा आला आहे. अजूनही धरणात पाणी येत असून पाण्याचा काटकसरीने वापर केला तरच ते एक वर्षभर पुरेल, असे सांगत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी लातूरकरांना थेट मांजरा धरणावरून पाणी बचतीचे आवाहन केले आहे.

लातूर - मांजरा धरणात बुधवारी (ता. 30) सकाळी आठ वाजेपर्यंत 34 दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणी आले आहे. चोवीस तासात दोन दलघमी पाणीसाठा आला आहे. अजूनही धरणात पाणी येत असून पाण्याचा काटकसरीने वापर केला तरच ते एक वर्षभर पुरेल, असे सांगत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी लातूरकरांना थेट मांजरा धरणावरून पाणी बचतीचे आवाहन केले आहे. त्यांनी धरणावरून मांजरा धरणाची माहिती देत बचतीचे आवाहन करत असलेला व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला असून त्यावरून पाणी बचतीवर चांगली चर्चा घडून येत आहे.

मागील दहा दिवसापासून शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी उपयुक्त असलेल्या धनेगाव (ता. केज, जि. बीड) येथील मांजरा धरणात पाणी येण्यास सुरवात झाली आहे. धरणाचा पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. यामुळेच धरणात दहा दिवसापूर्वी असलेला 3.370 दलघमी पाणीसाठा बुधवारी सकाळी 34.148 दलघमी झाला आहे. पाणीसाठ्यात काही दिवसात झपाट्याने वाढ झाल्याने धरणावर अवलंबून असलेल्या लातूर शहरासह अन्य शहरे व गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. गेल्या वर्षभरापासून लातूरकर तीव्र पाणी टंचाईचा सामना करत आहेत. धरणालात पाणी आल्यानंतर पाण्याची चिंता कमी होऊन पुन्हा त्याची काळजी कोणी करत नाही. पुन्हा दुष्काळ आला की पाणी बचतीवर चर्चा होते व पाऊस चांगला झाला ती बंद होते. या लातूरच्या परंपरेवर बोट ठेवत जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी पाणी आले तरी पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा, असे आवाहन केले आहे. व्हिडीओमधून त्यांनी मांजरा धरणाची माहिती दिली असून त्यातील पाणी पातळीवरून साठ्याचीही माहिती दिली आहे. भाऊबीजे दिवशी (ता. 29) सकाळी त्यांनी धरणाला भेट देऊन माहिती घेतली. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसह परिसरातील शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पाणी बचतीचा व्हिडीओ तयार केला व पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास पंधरा दिवसाआड पुरवठा करून ते पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत पुरेल, असे स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manjara dam water saving Appeal collector g shrikant