मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

हरि तुगावकर
Monday, 2 November 2020

लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले मांजरा धरण दोन वर्षांनंतर या वर्षी शंभर टक्के भरले. गेल्या काही दिवसांपासून धरणात पाण्याचा येवा कायम आहे.

लातूर :  लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले मांजरा धरण दोन वर्षांनंतर या वर्षी शंभर टक्के भरले. गेल्या काही दिवसांपासून धरणात पाण्याचा येवा कायम आहे. पाणी पातळी वाढू लागल्याने अखेर सोमवारी (ता. दोन) धरणाचे दोन दरवाजे दहा सेंटीमीटरने उघडून पाणी नदीच्या पात्रात सोडून देण्यात आले आहे. ९.९८६ घनमीटर प्रति सेकंद या प्रमाणे पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा आवाक कमी झाल्यानंतरच हे दरवाजे बंद केले जाणार आहेत. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशाराही पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, एक डिसेंबरला मतदान

लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यांच्या दृष्टीने हे धरण महत्त्वाचे आहे. धरण स्थापनेपासून मागील ४१ वर्षांत केवळ हे धरण १४ वेळेस शंभर टक्के भरले आहे. त्यात दोन वर्षांत या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्याने धरणात पाणीच आले नव्हते. धरणाच्या मृतसाठ्यातूनच लातूरसह १४ योजनांना पाणीपुरवठा केला जात होता. त्यात मोठ्या प्रमाणात कपातही करण्यात आली होती. त्यामुळे लातूर शहराला तर पावसाळ्यापर्यंत दहा दिवसातून एकदा म्हणजे महिन्यातून केवळ तीन वेळेस पाणी पुरवठा केला जात होता. या धरणावर १८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. पण धरणातच पाणी नसल्याने सिंचनाला पाणीही देता आले नव्हते. पण, यावर्षी धरण शंभर टक्के भरल्याने पिण्याच्या पाण्याचा तसेच सिंचनाच्या पाण्याचाही प्रश्न मिटला आहे.

अद्यापही धरणात पाण्याचा येवा
यावर्षी पावसाळ्यात सुरवातीला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात फारसा पाऊस झाला नाही. त्यामुळे यावर्षीही टंचाईला सामोरे जावे लागते की काय अशी शंका व्यक्त केली जात होती. पण, पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात तसेच परतीच्या पावसाने मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार हजेरी लावली. त्याचा परिणाम दसऱ्याच्या पूर्वीच हे धरण शंभर टक्के भरले गेले. अद्यापही धरणात पाण्याचा येवा येत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीवर पाणी गेल्याने सोमवारी धरणाच्या अठरा पैकी दोन दरवाजे उघडण्यात आले. सकाळी आठ वाजता हे दरवाजे उघडून पाणी मांजरा नदीच्या पात्रात सोडून देण्यात आले आहे. ९.८९६ घनमीटर प्रति सेंकद प्रमाणे या पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, अशी माहिती धरणाचे शाखा अभियंता शाहूराज पाटील यांनी ‘सकाळ’ला दिली.
 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manjra Dam's Two Gate Open Latur News