मराठा समाजाकडे दुर्लक्ष केल्यास आगामी निवडणुकीत परिणाम 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

औरंगाबाद - "प्रत्येक मोर्चातून संयम आणि शिस्तीचा आदर्श निर्माण करून देणाऱ्या मराठा क्रांती मोर्चांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा आगामी निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील,' असा इशारा गुरुवारी (ता. एक) समन्वयक सदस्यांनी दिला आहे. तसेच या मोर्चाला सरकार वेगळे वळण देऊ पाहत असून त्यास बळी न पडता संयम ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले. 

औरंगाबाद - "प्रत्येक मोर्चातून संयम आणि शिस्तीचा आदर्श निर्माण करून देणाऱ्या मराठा क्रांती मोर्चांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा आगामी निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील,' असा इशारा गुरुवारी (ता. एक) समन्वयक सदस्यांनी दिला आहे. तसेच या मोर्चाला सरकार वेगळे वळण देऊ पाहत असून त्यास बळी न पडता संयम ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले. 

मराठा क्रांती मोर्चाविषयी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले, की दोन दिवसांपासून सत्ताधारी पक्षाचे नेते मराठा क्रांती मोर्चाचा निवडणुकीत काहीही परिणाम झालेला नसल्याचे मुद्दामहून सांगत आहेत. मात्र, या निवडणुकीत समाजाने कुणाला मतदान करावे आणि कुणाला करू नये, असे सांगितलेच नव्हते. त्यामुळे विनाकारण तेढ निर्माण होईल, असे भाष्य नेत्यांनी करू नये. तसेच मोर्चाचा धसका घेतलेल्या सरकारने आपल्या नेत्यामार्फत वेगळे वळण देण्याचे तसेच फूट पाडण्याचे प्रयत्न आम्ही हाणून पाडू, तशी चाल खेळू नये. राज्यात क्रांती मोर्चाने कुठेही चक्‍काजाम अथवा रास्तारोकोसारखे आंदोलन हाती घेतलेले नसताना विनाकारण सोशल मीडियावर काहीही अफवा पसरविल्या जात आहेत. त्यास बांधवांनी बळी पडू नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

गेल्या काही वर्षांत समाजाची पीछेहाट होत असतानाही सहन केले. मात्र, आता हक्‍क मागत असताना लोकांना ती खदखद वाटत आहे. सामाजिक न्यायाच्या नावाखाली निश्‍चित केलेली चुकीची धारेणे, त्यावर आधारित विविध कायद्यांमुळे मराठा समाजाच्या अनेक पिढ्या हक्‍कापासून वंचित राहिल्या आहेत. आमच्या हक्‍कासाठी देशभरात मोर्चा काय असतो, हे दाखवून देऊनही मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना समाजाच्या लक्षात येत आहे. सरकारला निवेदनेही पोहचले आहेत. त्यावर त्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. लोकशाही पद्धतीनेच मोर्चे निघतील, याची काळजी घ्यावी. हिवाळी अधिवेशनावर येत्या 14 रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चात मराठवाड्यातून चार ते पाच लाख बांधव सहभागी होतील. प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी बैठका घेतल्या जात असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्यासाठी आगामी काळात अधिकृत वेबसाइट, ऍप्स तयार करण्याचे कामही हाती घेतले जात आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. 

Web Title: maratha kranti morcha affected upcoming election