#MarathaKrantiMorcha औरंगाबाद - फुलंब्री येथे ठिय्या आंदोलन

fulambri
fulambri

फुलंब्री (औरंगाबाद) : मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी फुलंब्री टी पॉईंटवर मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. दरम्यान पंढरपूर येथून परतणाऱ्या सुमारे चार हजार भाविकांना फुलंब्री टी पॉईंटवर ठिय्या आंदोलन करणाऱ्या मराठा समाज बांधवांनी मंगळवारी (ता.24) रोजी रात्रभर चहा व दुधाचे वाटप करून पुन्हा एकदा एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.

मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्यभरात सकल मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सुरू होते. यामध्ये सोमवारी गंगापूर तालुक्यातील काकासाहेब शिंदे या मराठा बांधवाने आरक्षणास उशीर होत असल्याने जलसमाधी घेतल्यानें वातावरण आणखी गरम झाले आहे.

दरम्यान काकासाहेब शिंदे व येथील मराठा समाज बांधवांनी दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी, तहसीलदार व पोलीस प्रशासनाला याबाबत निवेदनाद्वारे कळविले होते. परंतू तालुका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने या निवेदनाकडे दुर्लक्ष केले. याठिकाणी निवेदनाच्या पर्शवभूमीवर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती. त्यामुळे काकासाहेब शिंदे यांना मराठा आरक्षणासाठी शहिद व्हावे लागले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. राज्यामध्ये गावागावात मोठमोठ्या आंदोलनासह चक्काजाम करून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे.

फुलंब्री तालुक्यातही मंगळवारी कडकडीत बंद पाळून तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. तसेच फुलंब्री येथील टी पॉईंटवर मंगळवारी  सायंकाळपर्यंत आंदोलन करून ठिय्या आंदोलन केले. मराठा समाजबांधवांचा वाढता पाठींबा लक्षात घेऊन फुलंब्री टी पॉईंटवर मंडप उभारून मागण्या पूर्ण होई पर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहणार असल्याचे फुलंब्री तालुका सकल मराठा समाज बांधवांनी सांगितले. याच दरम्यान फुलंब्री टी पॉईंटवर ठिय्या आंदोलने सुरू असताना श्रीक्षेत्र पंढरपूर येथून परतणाऱ्या भाविकांची वाहने थांबून त्यांना चहा व दुधाचे रात्रभर वाटप करून पुन्हा एकदा एक अनोखा उपक्रम राबवून फुलंब्री सकल मराठा समाजाने सामाजिक बांधिलकी जोपासली. एका- पाठोपाठ एक असे शेकडो वाहने रात्रभर थांबल्याने सुमारे  चार हजार भाविकांना रात्रभर चहा व दुधाचे वाटप केले.

ठिय्या आंदोलन सुरूच राहणार  
 मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, पोलीस प्रशासनाने मुख्यमंत्र्यांवर 302 चा गुन्हा दाखल करावा, मराठा समाजासाठी शहीद झालेल्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत घ्यावी, मराठा आरक्षणाचा मुद्दा तात्काळ निकाली काढावा, मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत फुलंब्री येथील टी पॉईंटवर ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचे मराठा समाजाच्या समन्वयकांनी सांगितले. तसेच या आंदोलना दरम्यान काहीही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा फुलंब्री तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com