मराठा क्रांती मोर्चाने केली फसव्या आश्‍वासनांची होळी

राजेभाऊ मोगल 
गुरुवार, 21 मार्च 2019

या मागण्यांचे काय झाले? 
-कोपर्डीच्या नराधमांचे काय झाले? 
-आरक्षण का फसवेच ठरले? 
-स्वामिनाथन आगोगाची अंमलबजावणी का झाली नाही? 
-अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाकडून गरजूंना कर्ज मिळेना. 
-समाजाची फसवणूक करणाऱ्यांची सीबीआयमार्फत चौकशी करा. 
-मोर्चादरम्यान बलिदान दिलेल्या समाजबांधवांना आर्थिक मदत का दिली नाही? 
-समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊंचे नाव का दिले जात नाही? 
-काही जणांना हाताशी धरून मोर्चा थांबविण्याचा का प्रयत्न केला?

औरंगाबाद : लाखोंचे ऐतिहासिक मोर्चे काढूनही सरकारकडून केवळ आश्‍वासनेच मिळाली. प्रत्येकवेळी समाजाला गृहीत धरल्याने घोर फसवणूक झाल्याची भावना आता मराठा समाजात उफाळून येत आहे. त्यामुळे होळीनिमित्त बुधवारी (ता.20) मराठा क्रांती मोर्चातर्फे सरकारने दिलेल्या आश्‍वासनांचीच होळी करण्यात आली. तसेच सरकारच्या नावाने बोंबाही मारल्या. 

औरंगाबादेतून मुहूर्तमेढ रोवलेल्या मराठा क्रांती मोर्चाने मागील अडीच वर्षांत सातत्याने सरकारला धारेवर धरले. समाजाच्या एकजुटीने सरकारला धडकी भरल्याचेही अनेकदा पाहायला मिळाले; मात्र प्रत्येकवेळी आश्‍वासनांची बोळवण करीत काही जणांना हाताशी धरत सरकारने आंदोलन थांबविण्याचे प्रयत्नही केले; मात्र त्यानंतर समाज आणखी संतापला आहे. अडीच वर्षांत एकही मागणी पूर्णत्वास गेलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाची तयारी केली जात आहे. दरम्यान, बुधवारी होळीनिमित्त मराठा क्रांती मोर्चा समन्वयक जळगाव रोडनजीक एकत्र आले. सरकारने दिलेल्या आश्‍वासनांचे प्रत्येकांनी हाती पोस्टर्स घेत त्याची होळी केली.

यावेळी सरकारच्या विरोधात बोंबही मारण्यात आली. तसेच समाजात फूट पाडू पाहणाऱ्यांचा, मोर्चा सरकारच्या दावणीला बांधू पाहणाऱ्यांचा निषेध करण्यात आला. काही जणांनी सरकारबद्दल तीव्र भावना व्यक्‍त केल्या. आगामी भूमिका ठरविण्यासाठी लवकरच राज्यभर बैठका घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. पुन्हा एकदा क्रांती मोर्चाचे वादळ सुरू होणारच, असा निर्धारही करण्यात आला. याप्रसंगी समाजाच्या प्रश्‍नांवर सतत लढा उभा करणारे समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या मागण्यांचे काय झाले? 
-कोपर्डीच्या नराधमांचे काय झाले? 
-आरक्षण का फसवेच ठरले? 
-स्वामिनाथन आगोगाची अंमलबजावणी का झाली नाही? 
-अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाकडून गरजूंना कर्ज मिळेना. 
-समाजाची फसवणूक करणाऱ्यांची सीबीआयमार्फत चौकशी करा. 
-मोर्चादरम्यान बलिदान दिलेल्या समाजबांधवांना आर्थिक मदत का दिली नाही? 
-समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊंचे नाव का दिले जात नाही? 
-काही जणांना हाताशी धरून मोर्चा थांबविण्याचा का प्रयत्न केला?

Web Title: Maratha Kranti Morcha holi at Aurangabad