लातूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला प्रतिसाद देत मुरूड (ता. लातूर) येथे सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. 25) बंद पाळण्यात आला आहे. यामुळे दर बुधवारी मुरूड येथे भरणारा आठवडी बाजार रद्द करण्यात आला असून बंदची हाक देत कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यासमोर सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव येथील काकासाहेब शिंदे या युवकाने जलसमाधी घेतल्यानंतर आंदोलनाची धग वाढली आहे. राज्यभरात विविध ठिकाणी रास्ता रोको, बंद आदी स्वरूपाचे आंदोलन सुरू आहे. यातूनच मंगळवारी (ता. 24) पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मुरूड येथे मोठा प्रतिसाद मिळाला. लातूर तालुक्यातील लातूरनंतर मुरूड ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. बंदमुळे मंगळवारचा जनावरांचा आठवडी बाजार रद्द झाला होता. मंगळवारी सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाने दुपारी वेगळे वळण घेतले.
कार्यकर्त्यांनी गावातून जाणारा लातूर - बार्शी रस्ता रोखून धरला. सायंकाळी चौकाचौकात टायर पेटवून दिल्याने वातावरण तणावग्रस्त झाले. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी लातूर - बार्शी रस्त्यावरील वाहतूक वळण रस्त्याने वळवली. रात्री उशिरापर्यंत वळण रस्त्याने वाहने धावत होती. राज्यभर आंदोलन सुरू असतानाच आणखी एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाल्याचे कळताच कार्यकर्ते आक्रमक झाले. सर्वांनी एकत्र येत बुधवारीही बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मंगळवारी रात्री ध्वनिक्षेपकावरून बंदचे आवाहन केले. यामुळे बुधवारी येथे आठवडी बाजाराला येणाऱ्या व्यापारी तसेच नागरिकांची गैरसोय झाली नाही. बुधवारी सकाळपासूनच गावात शांततेत बंद सुरू असून कार्यकर्ते शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन करत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.