आंदोलन थांबवून मराठा क्रांती मोर्चाची पूरग्रस्तांना मदत

राजेभाऊ मोगल
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

सांगली, कोल्हापूर परिसरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे हाहाकार माजला आहे. त्यांच्याप्रती असलेल्या संवेदना व्यक्‍त करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने
शुक्रवारी (ता. नऊ) नियोजित आंदोलन स्थगित केले आहे. शिवाय तेथे जाऊन मदत करणार असल्याचा निर्धारही समन्वयकांनी व्यक्‍त केला. 

औरंगाबाद - सांगली, कोल्हापूर परिसरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे हाहाकार माजला आहे. त्यांच्याप्रती असलेल्या संवेदना व्यक्‍त करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने
शुक्रवारी (ता. नऊ) नियोजित आंदोलन स्थगित केले आहे. शिवाय तेथे जाऊन मदत करणार असल्याचा निर्धारही समन्वयकांनी व्यक्‍त केला. 

सध्या राज्याच्या विविध भागांत पावसाने जनजीवन विस्कळित करून टाकले आहे. विशेषत: सांगली आणि कोल्हापूर परिसरातील हजारो एकरांवरील केवळ पिकेच पाण्याखाली गेली असे नव्हे, तर शेकडो गावे पाण्याखाली गेली आहेत. यात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांसह इतर सर्वांचेच करोडो रुपयांचे नुकसान झाले. त्यांच्या जगण्याचा प्रश्‍न निर्माण झालेला असताना आपण आंदोलने करणे, हे संवेदना बोथट असल्याचे लक्षण होईल, असे म्हणत क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी क्रांतिदिनी येथील क्रांती चौकात होणारे आंदोलन स्थगित केले आहे. गेल्या तीन वर्षांपासून सरकार मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे.

प्रलंबित मागण्यांवर बोलत नाही. आरक्षणाच्या लढ्यात बलिदान दिलेल्या बांधवांना अद्यापही मदत दिलेली नाही. त्यांच्या घरातील एका व्यक्‍तीस नोकरीही दिलेली नाही. यासाठी क्रांतिदिनी आंदोलनाचा निर्धार केला होता; मात्र पूरपरिस्थितीमुळे हाहाकार उडालेला असताना आंदोलन करणे, हे आपले संस्कार नाहीत, असेही समन्वयकांनी बोलून दाखवले. पूरग्रस्त भागात आवश्‍यक त्या मदतीसाठी आम्ही तेथे जाणार आहोत, असे क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी जाहीर केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha movement postponed