मुंबईचा मराठा क्रांती मूक मोर्चा ही दुसरी लढाई: औरंगाबाद जिल्हा बैठकीत एल्गार 

अतुल पाटील
रविवार, 23 जुलै 2017

मुंबईतील मोर्चा भायखळा ते आझाद मैदान पर्यंत निघणार असून नियोजनासाठी औरंगाबादमध्ये सिडकोतील गुलाब मंगल कार्यालयात रविवारी (ता. 23) जिल्हास्तरीय बैठक झाली. यात वर्षभरापूर्वी तालुका स्तरावर मोर्चासाठी पुढाकार घेणाऱ्या समाजबांधवांना बोलावण्यात आले होते

औरंगाबाद : कोपर्डी प्रकरणानंतर विविध मागण्या घेऊन राज्यभर मराठा क्रांती मोर्चे निघाले, राज्य सरकारने कोणत्याही मागण्या ठोसपणे मान्य केल्या नसल्याने मुंबईत 9 ऑगस्टला राज्यव्यापी महामोर्चा निघणार आहे. त्यासाठी जिल्हा, तालुका, सर्कल, गाव पातळीवर बैठका घेऊन मोर्चे बांधणी करण्यात येणार आहे. मुंबईचा महामोर्चा ही दुसरी लढाई असल्याचा सूरदेखील जिल्हा बैठकीत निघाला. 

मुंबईतील मोर्चा भायखळा ते आझाद मैदान पर्यंत निघणार असून नियोजनासाठी औरंगाबादमध्ये सिडकोतील गुलाब मंगल कार्यालयात रविवारी (ता. 23) जिल्हास्तरीय बैठक झाली. यात वर्षभरापूर्वी तालुका स्तरावर मोर्चासाठी पुढाकार घेणाऱ्या समाजबांधवांना बोलावण्यात आले होते. बैठकीत सर्वच राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्तेही उपस्थित होते. तब्बल तीन तास चाललेल्या बैठकीत अनेक विषयावर चर्चा झाली. मराठा समाजाचे वर्षभरात आजवर निघालेले मोर्चाने शिस्त जपली, तोच शिरस्ता मुंबईच्या महामोर्चातही जपणार आहेत. यावर एकमत झाले. 

सरकारशी चर्चेसाठी अभ्यास गट 
वर्षभर निघालेल्या मराठा क्रांती मोर्चात सरकारशी चर्चा करण्यासाठी कोणीच गेले नसल्याने मुख्यमंत्रीही वारंवार तेच बोलून दाखवत होते. यामुळे मुंबईच्या महामोर्चासाठी सरकारशी चर्चेसाठी अभ्यासगट स्थापन करण्यात येणार आहे. 

सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा वापर 
मुंबईच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी रेल्वे, एसटीसारख्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा नागरिकांनी अधिकाधिक वापर करावा, असे ठरले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून महिलांना जाण्यासाठी संयोजकातर्फे वाहतुक व्यवस्था करण्यात आली आहे. 

मुंबईत इंग्रजीमधून बॅनर झळकणार 
मुंबईत वेगवेगळ्या जाती, धर्माचे लोक राहत असल्याने बहुभाषिक लोकांना माहिती व्हावी, तसेच मीडियाच्या माध्यमातून देशाचे आणि जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी इंग्रजीमधून बॅनर तयार करण्यात येतील. ते मुंबईत झळकतील. 

राज्यातून मोर्चासाठी मागण्या मागवणार 
कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी, शेतकरी आणि विद्यार्थी प्रश्‍न, मराठा आरक्षण या प्रमुख मागण्यांबाबत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून मागण्यांची निवेदने मागवण्यात येणार आहेत. त्या एकत्रित मागण्या सरकारकडे केल्या जातील. 

मोर्चासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन 
मोर्चाचे नियोजन होण्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. प्रचार, पार्किंग, सोशल मीडिया, अन्न-पाणी, स्पिकर, डॉक्‍टर, युवक-युवती याप्रमाणे समित्या तयार करण्यात आल्या असून जबाबदारी सोपवली आहे. 

नाहीतर आमदारांचा होणार निषेध 
मोर्चापुर्वी पावसाळी अधिवेशन होत आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आमदारांनी आक्रमक व्हावे, नाहीतर मुंबईच्या महामोर्चात प्रश्‍न उपस्थित न करणाऱ्या आमदारांचा निषेध केला जाणार आहे.

Web Title: Maratha kranti morcha Mumbai esakal news