परभणीत मराठा आंदोलन पेटले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

पूर्णा : मराठा आरक्षणाच्या मागणीचा वणवा विझता विझत नसून आजही तालुक्यातील प्रमुख मार्गावर आगडोंब पहावयास मिळाले. माटेगाव, आहेरवाडी फाटा ,चुडावा ,धानोरा मोत्या आदी ठिकाणी चक्का जाम करण्यात आला आहे.

पूर्णा : मराठा आरक्षणाच्या मागणीचा वणवा विझता विझत नसून आजही तालुक्यातील प्रमुख मार्गावर आगडोंब पहावयास मिळाले. माटेगाव, आहेरवाडी फाटा ,चुडावा ,धानोरा मोत्या आदी ठिकाणी चक्का जाम करण्यात आला आहे.

मराठा आंदोलनाने तालुक्यातील  चांगलाच जोर धरला असून सोमवारी (ता. 30) माटेगाव, आहेरवाडी फाटा ,चुडावा, धानोरा मोत्या, आदी ठिकाणी बंद पाळून रास्ता रोको करण्यात आला. माटेगाव येथे मोर्चेकऱ्यांनी गावातून मोर्चा काढून पोलीस अधिकारी गणेश राठोड यांना आरक्षणाच्या व इतर मागण्यांचे निवेदन दिले.यावेळी महसूल प्रशासनाच्या श्रीमती घाटूळ उपस्थित होत्या.रस्त्यावर टायर व लाकडे जाळून त्यांनी पूर्णा झिरो फाटा मार्ग रोखून धरला .पूर्णा ते झिरोफाटा हा महत्वाचा राज्यमार्ग दुपारपर्यंत रोखून धरल्याने या रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

यावेळी माटेगाव, कौडगाव, नावकी, आहेरवाडी, सुरवाडी, आदी ठिकाणचे शेकडो युवक रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. त्याच बरोबर पूर्णा नांदेड रोडवर चुडावा येथे तसेच धानोरा मोत्या येथेही रास्ता रोको करण्यात आला.त्यामुळे वाहतूक प्रभावित झाली होती. आंदोलक आता गनिमी कावा पद्धतीने आंदोलन अधिकच तिव्र करीत आहेत त्यामुळे  पोलीस प्रशासनाची मात्र चांगलीच तारांबळ उडत असल्याचे दिसून येत आहे. आज पूर्णेतील आठवडी बाजार असल्याने मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील जनता पूर्णेच्या दिशेने निघाली होती परंतु आंदोलकांनी पोलीसांच्या वाहनासह सर्वच वाहनांना जागेवरच रोखल्याने वाहतूक जागोजागी खोळंबल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.सरकार विरोधी नारे देत मराठा आरक्षणाची मागणी करण्यात येत होती. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डीले, पोलीस निरिक्षक सुनील ओव्हळ, विशाल बहात्तरे, पांडुरंग रणखांब, किरण शिंदे यांनी चोख बंदोबस्त ठेवून अनुचित घटना घडू नये यासाठी आंदोलकांशी संवाद साधला.

Web Title: maratha kranti morcha at parbhani