मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी बाळासाहेब सराटेंना फासले काळे

अतुल पाटील
शुक्रवार, 16 मार्च 2018

मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगातर्फे सुभेदारी विश्रामगृहात शुक्रवारी (ता. 16) जनसुनावणी सुरु असताना हा प्रकार घडला.

औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बाळासाहेब सराटे यांच्या तोंडाला काळे फासून धक्काबुक्की करत परिसरातून हाकलून दिले. मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगातर्फे सुभेदारी विश्रामगृहात शुक्रवारी (ता. 16) जनसुनावणी सुरु असताना हा प्रकार घडला.

जनसुनावणीसाठी सकाळी साडेदहा वाजता सुरुवात झाली. वैयक्तिक, संस्था, संघटना निवेदने देत होती. पावणेबारा वाजता मराठा क्रांती मोर्चातील समन्वयक आप्पा कुढेकर, रमेश केरे, रविंद्र काळे आदी समन्वयकांनी आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमुर्ती एम. जी. गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी, जनसुनावणीतील अर्ज बाळासाहेब सराटे हे का स्विकारतात? ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिद्दु असल्याने त्यांच्या प्रतिष्ठानला सर्वेक्षणाचे काम देऊ नये. असा आक्षेप समन्वयकांनी घेतला. त्यावर, सराटेंना सर्व प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात येईल, असे श्री. गायकवाड यांनी आश्वासन दिले. मात्र, बाहेर पडताना समन्वयकांना प्रवेशद्वाराजवळ श्री. सराटे दिसले. तुम्ही इथे काय करता? असे म्हणत त्यांना हाकलून दिले. जाण्यास नकार देणाऱ्या सराटेंना मारहाण करण्यात आली. त्यावेळी रमेश केरे यांनी सराटेंच्या तोंडाला काळे फासत हाकलवून लावले. पोलिसांनी हस्तक्षेप करत सराटेंना पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. यावेळी आक्रमक समन्वयकांनी किशोर चव्हाण यांनाही हाकलून द्या, अशी विनंती पोलिसांना केली. दरम्यान, याप्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सराटे यांनी गुन्हा दाखल करणार नसल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

आयोगाचे सदस्य चक्क झोपलेत
जनसुनावणीतील निवेदने अध्यक्ष एम. जी. गायकवाड आणि सदस्य सर्जेराव निमसे स्विकारत आहेत. चर्चेसाठी कुणालाच संधी देत नाहीत. तसेच छायाचित्र घेण्यासाठी पत्रकारांनाही परवानगी नाकारण्यात आली आहे. दरम्यान, अपवाद इतर आयोगाचे सदस्य चक्क झोपले होते.

Web Title: Maratha Kranti Morchas coordinators threw blacks on balasaheb sarate