वैजिनाथच्या पाठीशी मुरमा गाव उभे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

तीर्थपुरी (ता. घनसावंगी) - मराठा आरक्षणाविरोधी याचिका दाखल करणारे ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबईत न्यायालयाच्या परिसरात हल्ला केल्याप्रकरणी मुरमा (ता. घनसावंगी) येथील वैजिनाथ प्रभाकर मुकणे (वय 32) याला मुंबईत पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेची माहिती मिळताच मुरमा येथील ग्रामस्थ वैजिनाथ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.

तीर्थपुरी (ता. घनसावंगी) - मराठा आरक्षणाविरोधी याचिका दाखल करणारे ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबईत न्यायालयाच्या परिसरात हल्ला केल्याप्रकरणी मुरमा (ता. घनसावंगी) येथील वैजिनाथ प्रभाकर मुकणे (वय 32) याला मुंबईत पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेची माहिती मिळताच मुरमा येथील ग्रामस्थ वैजिनाथ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.

वैजिनाथ मुकणे यालाही न्यायालयाच्या परिसरात जबर मारहाण करण्यात आली असून, त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आरक्षणाच्या लढाईत वैजिनाथने हिरिरीने सहभाग घेतला होता. जालना व मुंबईतील आंदोलनातही तो सहभागी होता. त्यामुळे एक कष्टकरी युवक म्हणून त्याच्या भावना लक्षात घ्याव्यात, गावकरी त्यांच्या बाजूने उभे आहेत, असे ग्रामस्थ सुदामराव मुकणे म्हणाले.

कोण आहे वैजिनाथ?
पदवीधर असलेला वैजिनाथ भूमिहीन असल्याने त्यांचे आई-वडील गावात सालगडी म्हणून काम करतात. पत्नीही मजुरी करते. दुष्काळी परिस्थितीमुळे तो दोन महिन्यांपूर्वी पुण्यात कामाच्या शोधात गेले होते. काम मिळाल्याने पंधरा दिवसांपूर्वी त्याने पत्नी व मुलांनाही पुण्यात नेले.

काय म्हणाले आई-वडील
पदवीधर असूनही वैजिनाथला नोकरी मिळत नव्हती. म्हणून तो कामाच्या शोधात पुण्यात गेला. त्याच्याशी फोनवरून बोलणं व्हावं, अशी इच्छा आई विमल मुकणे यांनी व्यक्त केली; तर मराठा आरक्षण जाहीर होताच वैजिनाथला खूप आनंद झाला होता. मात्र, कुणीतरी यात खोडा आणल्याने त्याचा जीव चिडला असेल, असे वडील प्रभाकर मुकणे म्हणाले.

"मराठा क्रांती मोर्चा पाठीशी उभा'
जालना - मराठा क्रांती मोर्चा वैजिनाथ मुकणे याच्या पाठीशी उभा राहणार असून, न्यायालयीन लढाईसाठी त्यांच्या कुटुंबीयांना आवश्‍यक ती मदत करण्याचा निर्णय सोमवारी (ता. 10) मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला. "घडलेल्या घटनेचे मराठा क्रांती मोर्चा समर्थन करीत नाही. मात्र, समाजाची यामागची भावना लक्षात घेऊन वैजिनाथच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला,' अशी माहिती समन्वयक जगन्नाथ काकडे यांनी दिली. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मुरमा गावात जाऊन वैजिनाथ याच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली आहे.

Web Title: Maratha Reservation Petition Vaijnath Mukane Murama Village