मुख्यमंत्र्याच्या सभेत मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी

Devendra Fadnavis,
Devendra Fadnavis,

पैठण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेत मराठा आरक्षणाची मागणी करत फलक झळकावून घोषणाबाजी करणाऱ्या अखिल भारतीय छावा संघटनेच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, कन्नड व खुलताबाद नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री रविवारी पैठणला आले होते. जाहीर सभा सुरू असतानाच छावाच्या कार्यकर्त्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे अशी घोषणाबाजी करत फलक झळकावले. अचानक झालेल्या प्रकाराने पोलिस यंत्रणेचीही भंबेरी उडाली. तत्काळ पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या हातातील फलक जप्त करत त्यांना अटक केली.


पैठण व गंगापूर येथे युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 11 वाजता गंगापूरला तर दुपारी 12 वाजता पैठणला देवेंद्र फडणवीस याची जाहीर सभा झाली. पैठण येथील जाहीर सभेत नोटाबंदी, 2019 पर्यंत राज्यातील प्रत्येकाला घर याशिवाय विविध मुद्यांवर बोलत असताना अचानक मागच्या बाजूला गोंधळ सुरू झाला. 25 ते 30 जणांच्या घोळक्‍याने उभे राहून जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे असा मजकूर लिहिलेले फलक देखील सभेत झळकावण्यात आले. हा प्रकार सुरू असतानाच बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांकडे धाव घेऊन त्यांच्या हातातील फलक जप्त केले व त्यांना अटक करून पोलिस ठाण्यात नेले. घोषणाबाजी करणारे तरुण हे अखिल भारतीय छावा संघटनेचे कार्यकर्ते असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


देश बदलतोय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार, पाचशेच्या नोटांवर बंदी घालण्याचा धाडसी निर्णय घेतला, त्यामुळे पाकिस्तान व दहशतवाद्यांना चपराक बसली असून त्यांच्याकडील 6 हजार कोटी रुपये नष्ट झाल्याचा दावा श्री. फडणवीस यांनी गंगापूरच्या सभेत बोलताना केला. मोबाईल ऍप्सच्या माध्यमातून सरकार ई-गर्व्हनन्सची निर्मिती करत आहे. नगरपालिकांसह 270 प्रकारच्या सेवा याद्वारे जनतेपर्यंत पोचवण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व नगरपालिका डिजिटल करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली. मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश व महाराष्ट्र बदलत असल्याचा दावा देखील श्री. फडणवीस यांनी केला. शहरातील घन कचऱ्याचे व्यवस्थापन, सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते उद्योगांसाठी वापरण्याचा देखील सरकारचा विचार असल्याचे ते म्हणाले. केंद्राच्या घरकुल योजनेअंतर्गत 2019 पर्यंत राज्यातील प्रत्येक गरिबाला घर देण्यात येणार असून त्यासाठी 2 लाख घरकुलांना मंजुरी दिली असल्याचेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com