निम्मे शुल्क घेऊन प्रवेश देण्याच्या सूचना हवेतच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

औरंगाबाद - आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांसाठी निम्मे शुल्क घेऊन प्रवेश देण्याच्या सूचना प्रत्येक महाविद्यालयाला देण्यात आल्याचे सांगत निम्मे शुल्क सरकार भरेल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र, अद्यापही तशा सूचना न आल्याचा मुद्दा उपस्थित करत मराठा क्रांती मोर्चातर्फे मंगळवारी (ता. 19) सरकारचा निषेध करण्यात आला.

मराठा क्रांती मोर्चामुळे सरकारने नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मंत्री पाटील यांनी याबाबत माहिती दिली होती. तसेच ही सवलत न देणाऱ्यांवर कारवाई होईल, असेही ते म्हणाले होते. दरम्यान, या घोषणेनंतर गेल्या दोन दिवसांपासून मराठा संघटनांनी शहरातील अनेक महाविद्यालयात या निर्णयासंदर्भातील काही पत्र आले आहे का? अशी विचारणा केली. मात्र, तशा काहीही सूचना नसल्याचे महाविद्यालयातर्फे सांगण्यात आले. प्रवेशप्रक्रिया सुरू झालेली असतानाही अद्याप पत्र न आल्याने मंत्री पाटील यांनी पुन्हा एकदा समाजाला गाजर दाखविल्याचा आरोप विविध मराठा संघटनांनी केला. संतापलेल्या विविध संघटनांनी एकत्र मराठा क्रांती मोर्चातर्फे मंगळवारी येथील जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयात मंत्री पाटील यांच्या विरोधात घोषणात देत निषेध व्यक्‍त केला.

Web Title: maratha society student fee