जुळून येती व्हॉट्‌सॲपवर ‘रेशीम गाठी’!

संदीप लांडगे
गुरुवार, 26 एप्रिल 2018

औरंगाबाद - मराठा समाजातील तरुण-तरुणींचे विवाह मोफत जुळवून देऊन पालकांचे ओझे हलके करण्याचे काम महाराष्ट्र सोयरीक व्हॉट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. यासाठी अवघ्या महाराष्ट्रातील मराठा समाजाला एकत्र आणण्यासाठी ग्रुप ॲडमिन सुनील जवंजाळ यांनी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांचे ३६ ‘मराठा सोयरीक’ व्हाट्‌सॲप ग्रुपची निर्मिती करून तीन हजारांपेक्षा जास्त विवाह विनाहुंडा जुळवून आणले आहेत. 

मुले-मुली लग्नाच्या वयात आले की पालकांचे सोयरिकीसाठी नातेवाइकांचे उंबरठे झिजविणे सुरू होते. आप्तांमध्ये मनासारखे स्थळ न मिळाल्यास पित्याला काय करावे, हे सुचत नाही. वाढत्या शहरीकरणामुळे सगेसोयरे गावापासून विखुरले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी व पालकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने शेतकरी कुटुंबातील सुनील जवंजाळ पाटील यांनी २९ जानेवारी २०१६ ला समाजातील व्यक्तींना एकत्र करीत ‘मराठा सोयरीक’ व्हाट्‌सॲप ग्रुपची निर्मिती केली. ओळखी वाढवून महाराष्ट्रातील समाज सोयरिकांचे तालुका, गावनिहाय ३६ ‘मराठा सोयरीक’ व्हॉट्‌सॲप ग्रुप महाराष्ट्रभर तयार केले. पालकांच्या मदतीने मुला-मुलींचे परिचय पत्र ग्रुपवर टाकून त्यांच्या आवडीनुसार थेट संबंधित उपवर-वधूच्या पित्याशी संपर्क करून सोयरीक जुळविली जाते. 

व्हाट्‌सॲपच्या माध्यमातून सामाजिक नेटवर्क 
सोशल मीडियावर मराठा सामाजाचे राज्यातील सर्वांत मोठे सामाजिक नेटवर्क तयार झाले आहे. समाजाला विनामूल्य सेवा देत आतापर्यंत औरंगाबाद, नगर व पुणे येथे मेळावे घेतले आहेत. त्यातून अनेक युवक-युवती विवाहबद्ध झाले. या ग्रुपच्या माध्यमातून उद्या २७ एप्रिलला सोलापूरचा मुलगा व सोनारपिंपळगाव (ता. सिंदखेडराजा जि. बुलडाणा) येथील मुलगी यांचा विवाह होत आहे. 

व्यावसायिक विवाहसंस्था पालकांची लूट करतात. पालकांनी याला बळी न पडता समाजातील प्रत्येकाने जिव्हाळा बाळगून या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे. 
- सुनील जवंजाळ पाटील, बुलडाणा

माझ्या मुलाची मराठा सोयरीक ग्रुपच्या माध्यमातून नुकतीच सोयरीक झाली. २७ एप्रिलला विवाह सोहळा पार पडत आहे. ग्रुपच्या नियमानुसार कोणताही हुंडा घेतला नाही. 
झुंबरलाल भदे, निवृत्त शिक्षक

Web Title: Maratha Soyarik whatsapp Group