आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीसाठी मराठा तरुणांचे निवेदन 

अतुल पाटील
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

कुटुंबांना मदत देण्याचा प्रस्ताव महापालिकेने मंजूर केला. तसेच महापौरांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कुटुंबाला चार दिवसांत आर्थिक मदत घरपोच देऊ, असे विधान केले होते.

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी समाजातील तरुणाईने दिलेल्या बलिदानानंतर त्यांच्या कुटुंबीयांना महापालिकेने आर्थिक मदतीची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने मराठा तरुणांनी महापालिका आयुक्‍तांना निवेदन दिले आहे. 

आयुक्‍त निपुण विनायक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, काकासाहेब शिंदे, प्रमोद होरे, उमेश शेळके, कारभारी शेळके यांनी आरक्षणासाठी बलिदान दिले. त्या कुटुंबांना मदत देण्याचा प्रस्ताव महापालिकेने मंजूर केला. तसेच महापौरांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कुटुंबाला चार दिवसांत आर्थिक मदत घरपोच देऊ, असे विधान केले होते.

मात्र, सहा महिने उलटून एकाही तरुणाला मदत पोचली नाही. याची जाणीव 5 डिसेंबरला महापौरांना करून दिली होती. त्यावेळी दोन दिवसांत मदत देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यालाही महिना लोटला. त्यामुळे आयुक्‍तांनी या प्रकरणात लक्ष घालून आर्थिक मदत लवकरात लवकर देण्यात यावी, यासाठी प्रयत्न करावेत. 

निवेदनावर अक्षय ठुबे, आकाश गायकवाड, पवन थोरात, ऋषिकेश औताडे, अनिकेत मोरे, गौरव सिरसाठ, ऋषिकेश जगदाळे, सुमित आंबोलीकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

Web Title: Maratha youths appealed to help suicide victims