मराठा तरुणांच्या 'सामर्थ्य'कडून डकवाडीला पाच लाखांची मदत 

maratha
maratha

औरंगाबाद : क्रिकेटचे सामने भरवून उभारलेला निधी "सामर्थ्य प्रतिष्ठान'ने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या डकवाडी (ता.जि. उस्मानाबाद) गावाला देण्याचा निर्णय घेतला आहे. गावच्या शाश्‍वत विकासासाठी सुमारे पाच लाखांपर्यंतचा निधी ते टप्प्याटप्प्याने देणार आहे. तत्पूर्वी त्यांनी महाराष्ट्र दिनी डकवाडीत जाऊन दोन तास श्रमदानही केले. 

"सामर्थ्य'तर्फे नोव्हेंबर 2018 मध्ये सामर्थ्य प्रीमियर लीग भरवली. त्याच वेळी 106 विद्यार्थ्यांचा आरोग्य विमा काढत 300 झाडेही वाटली. लीगमधून सुमारे अडीच लाख जमा झाले. आठ संघांसह सहभागी खेळाडू, मित्र, कुटुंबीयांनी हा निधी उभारला. तेवढीच रक्‍कम प्रतिष्ठानने टाकली. त्या रकमेतून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे, असे ठरले. त्यानंतर आदित्य गोरे या युवकाने उस्मानाबाद परिसरात सुरू असलेल्या कामांचे "सामर्थ्य'समोर सादरीकरण केले. 

पाचशे लोकवस्ती असलेल्या डकवाडीच्या गावकऱ्यांनी 70 हजार रुपये लोकवर्गणी जमवीत पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून कामाला सुरवात केली आहे. गावकऱ्यांना आता "सामर्थ्य'ची साथ मिळाली आहे. चर खोदण्यासाठी साहित्य, जेसीबीसाठी डिझेल, वृक्षारोपण यांवर खर्च होईल. "सामर्थ्य'मध्ये मराठा समाजातील उद्योजक, अभियंते, प्राध्यापक, वकील, डॉक्‍टर, बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद, अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

"सामर्थ्य'च्या सदस्यांचे डकवाडीत श्रमदान 
"सामर्थ्य प्रतिष्ठान'तर्फे डकवाडीची निवड केली. प्रत्यक्ष गावाची पाहणी करताना महाराष्ट्रदिनी सायंकाळी पाच ते सातदरम्यान हातात टिकाव, फावडे, पाटी घेत गावकऱ्यांना चर खोदण्यास मदत केली. यात सुनील किर्दक, आशिष गाडेकर, राजेंद्र मगर, राहुल घोगरे, मधुर देसले, आदित्य शिंदे, अमित राजळे, रोहित नाईकवाडे, सुनील हिवाळे यांनी श्रमदान केले. 

"सकाळ'नेही उचलला भार 
डकवाडीच्या जवळून वाहणारा डोगल ओढा आहे. त्या ओढ्यात "सकाळ रिलीफ फंडा'तर्फे मे 2017 मध्ये दहा हजार घनमीटरचे काम केले असून, अधिकचा एक कोटी लिटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. यातून गावच्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीसह इतर दहा विहिरी आणि बोअरला पाणी सुरू झाले आहे. 

""एखाद्या खेड्याचा चेहरामोहरा बदलेल, त्या प्रकल्पावर काम करायचे ठरले होते. त्यानुसार डकवाडीची निवड केली. येथील मुलांनाही "सामर्थ्य' योग्य मार्गदर्शन करेल. 
- सुनील किर्दक 

दुष्काळग्रस्त गाव मदतीसाठी निवडायचे होते. त्यासाठी डकवाडीची निवड केली. येथे येऊन श्रमदान केले. यापुढेही आर्थिक आणि श्रमदानातून सहकार्य राहील. 
- राजेंद्र मगर 

समाजाला बरोबर घेऊन जाणे, हा उद्देश आहे. केवळ पैशांचे योगदान न देता, जे काम करतात त्यांच्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोचलो आणि श्रमदान केले. 
- आशिष गाडेकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com