#MarathaKrantiMorcha दोन आमदारांनी दिले राजीनामे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

माझा आवाज दाबला - हर्षवर्धन जाधव
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारपासून (ता. २५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलेले शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बुधवारी (ता. २५) आमदारकीचा राजीनामा दिला. पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. विधिमंडळात याप्रश्‍नी सरकारने माझा आवाज दाबला होता, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी श्री. जाधव यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. बुधवारी सायंकाळी चारपर्यंत आरक्षणाबाबतचा अध्यादेश काढा, अन्यथा राजीनामा देणार, असे त्यांनी घोषित केले होते.

माझा आवाज दाबला - हर्षवर्धन जाधव
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारपासून (ता. २५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलेले शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बुधवारी (ता. २५) आमदारकीचा राजीनामा दिला. पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. विधिमंडळात याप्रश्‍नी सरकारने माझा आवाज दाबला होता, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी श्री. जाधव यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. बुधवारी सायंकाळी चारपर्यंत आरक्षणाबाबतचा अध्यादेश काढा, अन्यथा राजीनामा देणार, असे त्यांनी घोषित केले होते.

दरम्यान, चार वाजताच आमदार जाधव यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे ई-मेलवरून पाठविला. याबाबत माहिती देताना श्री. जाधव म्हणाले, की विधानसभेत मराठा आरक्षणावर चर्चा स्थगन प्रस्तावाद्वारे करावी, अशी मागणी मी केली होती. त्यावेळी माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. शिवाय, मुख्यमंत्र्यांनी ठोस काहीच उपाययोजना सांगितली नाही. लोकांच्या समस्या सुटत नसतील तर माझे सदस्यत्व काहीही कामाचे नाही. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा दिला आहे. गुरुवारी (ता. २६) विधिमंडळात श्री. बागडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनाम्याची प्रत सादर करील. आरक्षणाच्या मागणीवर सरकार कोर्टाकडे बोट दाखवत आहे. मात्र, कोर्ट हे अस्तित्वात असलेल्या कायद्याचे पालन होते की नाही, हे पाहते. विधिमंडळास कायदा बदलण्याचा अधिकार आहे, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेपूर्वी त्यांची आमदार इम्तियाज जलील यांच्यासह मराठा क्रांती मोर्चातील अनेक समन्वयकांनी भेट घेतली.

पदापेक्षा समाज मोठा - चिकटगावकर
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संबंध समाज रस्त्यावर उतरला आहे. हा प्रश्‍न विधानसभेच्या सभागृहातही सोडला जात नाही. त्यामुळे माझ्या आमदारकीपेक्षा समाज मोठा असल्याचे सांगत वैजापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

राज्यभरात मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. या आंदोलनास विविध पक्षांचे पदाधिकारी, आमदार, खासदार पाठिंबा देत आहेत. मात्र, सभागृहात हा प्रश्‍न का मांडला नाही, असा सवाल आंदोलक त्यांना करीत आहेत.

दरम्यान, याप्रश्‍नी बुधवारी (ता.२५) सायंकाळी शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा देताच त्यांच्यापाठोपाठ आमदार चिकटगावकर यांनीही राजीनामा दिला आहे. याबद्दल बोलताना आमदार चिकटगावकर म्हणाले, की मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान माझ्या मतदारसंघातील युवक काकासाहेब शिंदे हुतात्मा झाले. अशावेळी पदापेक्षा समाज महत्त्वाचा असल्याने आपण राजीनामा देत आहोत. आता स्वाभिमान दाखविण्याची खरी गरज आहे. 

समाज शांततेच्या मार्गाने मागील २३ महिन्यांपासून आंदोलने करीत आहे. तरीही त्यांच्याकडे साधे लक्षही दिले गेले नाही. उलट सत्ताधारी राज्यकर्ते मराठा समाजावर टीका करीत आहेत. यामुळे आंदोलक आणखी आक्रमक झाले आहेत. बहुसंख्येने असलेल्या या समाजातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. जगणे अवघड झालेले असताना मुलांना शिकवायचे कसे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा आहे. तरीही सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही. त्यामुळे गुरुवारी (ता.२६) विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन राजीनाम्याची प्रत देणार असल्याचे श्री. चिकटगावकर यांनी सांगितले.

Web Title: #MarathaKrantiMorcha harshwardhan jadhav & bhausaheb chikatgaonkar resign for maratha reservation