#MarathaKrantiMorcha औरंगाबादेतून घोंगावणार मराठा मोर्चाचे वादळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चाची जेथून मुहूर्तमेढ रोवली गेली त्या औरंगाबाद शहरातूनच पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला शनिवारपासून (ता. २१) सुरवात झाली आहे. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला साक्षी ठेवत एकवटलेल्या समाजबांधवांनी हा लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्‍त केला. त्यामुळे येथून पुन्हा एकदा मराठा मोर्चाचे वादळ घोंगावणार असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चाची जेथून मुहूर्तमेढ रोवली गेली त्या औरंगाबाद शहरातूनच पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला शनिवारपासून (ता. २१) सुरवात झाली आहे. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला साक्षी ठेवत एकवटलेल्या समाजबांधवांनी हा लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्‍त केला. त्यामुळे येथून पुन्हा एकदा मराठा मोर्चाचे वादळ घोंगावणार असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

कोपर्डी येथील घटनेचा निषेध आणि मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी पहिल्या मोर्चाची सुरवात येथूनच झाली होती. येथे ठरलेली आचारसंहिता राज्यभरातील ऐतिहासिक ५८ मोर्चांमध्ये पाळली गेली. त्यानंतर अनेक दिवस उलटूनही सरकारने मागण्या मान्य तर केल्याच नाहीत; उलट काही जणांना हाताशी धरून समाजातील आंदोलकांमध्ये फूट पाडण्याचा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केला जात आहे. 

दुसऱ्या टप्प्यातील मराठा क्रांती ठोक मोर्चाला परळीतून सुरवात झाल्यानंतर शनिवारी औरंगाबाद येथून पुन्हा एकदा ठिय्या आंदोलनाची हाक देण्यात आली. गृहीत धरले जात असल्याचा राग मनात असल्याने समाजातील तरुण, नागरिकांनी सकाळपासूनच क्रांती चौक येथे या आंदोलनात सहभाग नोंदवण्यास सुरवात केली. तसेच जिल्हाभरातून समाजबांधव मोठ्या संख्येने यात सहभागी होणार असल्याने आंदोलनस्थळीच त्यांची मुक्‍कामाची सोय व्हावी, यासाठी मंडपही टाकण्यात आला आहे. अनेकांनी सोबत भाजी-भाकरीदेखील आणली. 

दुपारी १२ वाजेच्या सुमारास निदर्शनाने आंदोलनास सुरवात झाली. यावेळी सरकारवर कठोर शब्दांत ताशेरे ओढत तासभर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी सिडको परिसरात बैठक झाली होती. त्यानुसार क्रांती चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन, उपोषण आणि निदर्शने करण्यात आली आहेत.  यापुढील आंदोलने शांतपणे होणार नाहीत, त्यामुळे आता वेगळेपणा असायला हवा. आक्रमकपणा दाखवावाच लागेल, त्याशिवाय सरकारला ताकद कळणार नाही, अशी भूमिकाही काही जणांनी मांडली. 

आता लक्षवेधी लढाई 
पहिल्या क्रांती मोर्चाची सुरवात येथूनच झाल्याने दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जोरदार लढाई उभी करण्याची तयारी समन्वयकांनी केली आहे. त्यासाठी तालुका, सर्कल, गावपातळीवर संपर्क साधलेला आहे. त्यामुळे येथून सुरवात झालेले आंदोलन लक्षवेधी ठरेल, अशी रणनीती आखली जात आहे.

आषाढी एकादशीपूर्वीच निर्णय घ्या 
मराठा समाजाला झुलवत ठेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना वारकरी, कष्टकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पांडुरंगाची पूजा करू न देण्याचा निर्णय असंख्य जणांनी घेतला आहे. काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी राज्य सरकारच जबाबदार असेल, असेही यावेळी जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या पंढरपुरात येण्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे एकतर आषाढी एकादशीपूर्वीच मागण्या मान्य कराव्यात; अन्यथा समाजाच्या रोषाला सामोरे जाण्याची हिंमत ठेवावी, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.

जिल्हानिहाय पडसाद...
बीड -
 परळीत ठिय्या चौथ्या दिवशीही सुरूच, जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांची भेट, मागण्या शासनाला कळवू, आंदोलन मागे घेण्याचे आवाहन, लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही अशी आंदोलकांची भूमिका, वडवणीत बाजारपेठ बंद, पाटोद्यात दुसऱ्या दिवशीही ठिय्या सुरूच.

नांदेड - नांदेड - लातूर महामार्गावर दोन बसच्या तसेच अर्धापूर महामार्गावर एका बसची काच फोडली. देगलूर, हिमायतनगर, भोकरमध्ये ठिय्या आंदोलन.

परभणी - पाथरीत रास्ता रोको, आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा सहभाग, गंगाखेडमध्ये रात्री सव्वादहाला लातूर-जिंतूर बसवर दगडफेक.

हिंगोली  - जवळाबाजार (ता. औंढा नागनाथ) येथे रास्ता रोकोदरम्यान तीन बस फोडल्या, हिंगोलीत धरणे, सेनगावात ‘बंद’

लातूर - रेणापूर येथे ‘बंद’, औसा रास्ता रोको.

जालना - परतूर, मंठा येथे दुसऱ्या दिवशीही धरणे, परतूर शहरात ‘बंद’.

उस्मानाबाद - कळंब येथे सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे, अज्ञाताकडून बसवर दगडफेक.

Web Title: #MarathaKrantiMorcha maratha reservation