#MarathaKrantiMorcha समन्वयकांचा सातपर्यंत ‘अल्टिमेटम’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

परळी वैजनाथ - मराठा समाज आरक्षणासह अन्य मागण्यांची शासनाने ता. सात ऑगस्टपर्यंत दखल न घेतल्यास क्रांती दिनापासून (ता. नऊ) राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी (ता. दोन) येथे पत्रकार परिषदेत दिला. राज्यभरातील समन्वयकांच्या येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली.

येथील उपविभागीय कार्यालयासमोर ता. १८ जुलैपासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज (ता. दोन) सोळावा दिवस होता. त्याचा आढावा व पुढील दिशा ठरविण्यासाठी राज्यभरातील समन्वयकांची आज येथे बैठक झाली. त्यानंतर श्री. पाटील यांनी माहिती दिली. २६ जिल्ह्यांतील समन्वयक उपस्थित होते.

डॉ. भापकर तळ ठोकून
विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर गेल्या दोन दिवसांपासून परळीत तळ ठोकून आहेत. ठिय्या आंदोलनात सहभागी प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या विश्रामगृहावर त्यांनी चर्चा केली. आंदोलन मागे घेण्यासाठी शासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाबाबत माहिती दिली. कार्यकर्ते मागण्यांवर ठाम असल्याने भापकर यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

या आहेत मागण्या...
आरक्षणासंदर्भात शासनाने कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा. आरक्षण जाहीर झाल्यानंतरच मेगा नोकर भरती करावी, आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे विनाअट, सरसकट मागे घ्यावेत, आंदोलनांदरम्यान आत्मबलिदान देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना भरीव आर्थिक मदत द्यावी, आरक्षणप्रश्‍नी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली उपसमिती तत्काळ बरखास्त करावी, इतर मागण्याही सोडवाव्यात, अशी मागणी पाटील यांनी केली. 

‘कायदा हाती घेऊ नका’
सात ऑगस्टपर्यंत या मागण्यांची दखल न घेतल्यास नऊ ऑगस्टपासून आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय समन्वयक समितीने घेतला असून, राज्यातील गावोगावी ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. रस्त्यावरील आंदोलन थांबवून कार्यकर्त्यांनी ठिय्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, कायदा हातात घेऊ नये, दगडफेक, जाळपोळ करू नये, आत्महत्या करू नये, मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने लढा देऊया, असे आवाहन समन्वयक पाटील यांनी केले.

Web Title: #MarathaKrantiMorcha maratha reservation agitation