#MarathaKrantiMorcha आंदोलनाचा भडका

औरंगाबाद - गुलमंडी येथे ठिय्या मांडून बसलेले आंदोलक.
औरंगाबाद - गुलमंडी येथे ठिय्या मांडून बसलेले आंदोलक.

औरंगाबाद - हुतात्मा काकासाहेब शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी प्राणाची आहुती दिल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद मंगळवारी शहरासह जिल्हाभरात उमटले. ठिकठिकाणी तीव्र आंदोलने झाली. रास्ता रोको, निदर्शने अन्‌ बंद पुकारण्यात आले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. समाजमनच पेटल्याने आंदोलनाचा भडका उडाला. काही ठिकाणी बसगाड्यांवर दगडफेक करण्यात आली. आंदोलकांनी सरकार आणि प्रशासनाविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. तसेच मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धारही आंदोलकांनी केला आहे. दरम्यान, वारकऱ्यांसाठी आंदोलकांनी सामंजस्याची भूमिका घेतली.

कायगावच्या पुलावर प्रचंड जमाव
हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लोकांचे जत्थेच्या जत्थे घोषणा देत पुलाकडे आंदोलनाच्या ठिकाणी पोचले. पुलाला हुतात्मा काकासाहेब शिंदे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हुतात्मा काकासाहेबांची शपथ घ्या आणि मागण्यांचा निर्णय होईपर्यंत एकाही मंत्र्याला, आमदाराला बाहेर पडू देऊ नका. गोरगरीब प्रवास करतात त्या बसगाड्या फोडण्याऐवजी आमदारांच्या गाड्या फोडा. आमच्या जिवावर सत्तेत आलेल्यांना त्यांची जागा दाखवून द्या, हीच काकासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन करण्यात आले. 

फायरब्रिगेडची गाडी पेटविली
श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुरू असताना, पुलावर फायर ब्रिगेडची गाडी पोचली. आधीच संतप्त झालेले आंदोलक आणखीनच भडकले. सोमवारी (ता.२३) जलसमाधी घेण्याचे आंदोलन सुरू असताना फायर ब्रिगेड मदतीला आले नाही आणि एक जण हुतात्मा झाल्यानंतर फायर ब्रिगेडची गाडी आल्याने आंदोलक चिडले आणि त्या गाडीची तोडफोड सुरू केली. काहींनी गाडी उलटी करून पेटवून दिली आणि वातावरण अधिकच तापले. आंदोलकांनी गाडी पेटवताच पुलाच्या एका बाजूला थांबलेल्या पोलिसांनी तिकडे धाव घेतली आणि लाठीमार सुरू केला. आंदोलकांना पुलावरून कायगावकडे पळवीत लाठीमार सुरू झाल्याने जमावात एकच पळापळ सुरू झाली.

रुग्णवाहिकेची वाट केली सुकर
पुलावर आंदोलन सुरू असल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. पोलिसांनी पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहने उभी करून बॅरिकेटस लावले होते. आंदोलन सुरू असतानाच पुलावर एक ॲम्बुलन्स आली; मात्र एवढ्या गर्दीतूनही आंदोलकांनी ॲम्बुलन्सला वाट करून दिली; मात्र अन्य वाहनांसाठी नो एंट्री होती. आषाढीनिमित्त वारीवरून परतणाऱ्या वारकऱ्यांनाही आंदोलकांनी कसलीच अडचण येऊ दिली नाही. नगरहून औरंगाबादकडे येणारी वाहने प्रवाशांना प्रवरा संगम येथे सोडत होती. तेथून प्रवासी पायी पूल पार करून कायगाव येथून मिळेल त्या वाहनाने औरंगाबादकडे येत होते.

आंदोलक म्हणतात...
मित्राला वाचवू शकलो नाही - 
बाळू बागल
मला चांगले पोहता येते, मी काकासाहेबांना वाचवू शकलो असतो. मी पोलिसांनाही तसे सांगितले, की मला जाऊ द्या; परंतु पोलिसांचा हलगर्जीपणा आणि त्यांनी केलेला बळाचा वापर यामुळे मी माझ्या मित्राला वाचवू शकलो नाही. 

पोलिसांनी घेतली बघ्याची भूमिका - संतोष जाधव
आम्ही सोमवारी दहापासून आंदोलनाला सुरवात केली; परंतु दुपारी तीन वाजेपर्यंत कोणी दखल घेतली नाही. पोलिसांनी बघ्यांची भूमिका घेतली. त्यामुळे एकाला नाहक आपला जीव गमवावा लागला. आम्ही हुतात्मा काकासाहेबांना वाचविण्याचा प्रयत्न करीत होतो, मात्र पोलिसांनीच आम्हाला अडविले. 

आपत्ती व्यवस्थापन नव्हते - योगेश शेळके
प्रशासनाने आंदोलनाच्या ठिकाणी सोमवारी कोणतीच व्यवस्था ठेवली नव्हती. आपत्ती व्यवस्थापन नव्हते, फायरब्रिगेड, लाइफगार्ड, स्पीड बोट, बलून्स यापैकी कोणतीच व्यवस्था करण्यात आली नव्हती. शासन, प्रशासनाने आंदोलन गांभीर्याने घेतले नाही. 

पोलिसांनी आम्हाला रोखले - प्रताप सोळुंके
हुतात्मा काकासाहेब शिंदे यांना आम्हाला वाचवायचे होते. आम्ही तसा प्रयत्न करीत होतो, मात्र पोलिसांनी आम्हाला अडविले. आम्ही त्यांना सांगितले, की आम्ही नाही तर किमान तुम्ही तरी त्यांना वाचवा; परंतु त्यांच्याकडे कोणतीही यंत्रणा नव्हती. बुडणाऱ्याला वाचवणे हे प्रशासनाचे काम होते; पण त्यांनी ते केले नाही. यामुळे संबंधित दोषींना निलंबित करावे. 

गांभीर्याने घेतले नाही - गणेश राऊत
शासनाने मराठा आरक्षणाचा मुद्दा, तर प्रशासनाने आंदोलन गांभीर्याने घेतले नाही. आंदोलक काकासाहेब शिंदे यांनी नदीपात्रात उडी घेतल्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी आवश्‍यक असणारी कोणतीही यंत्रणा यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांकडे किंवा प्रशासनाकडे नव्हती.

  सकाळपासूनच आंदोलकांची ‘बंद’ची हाक - ७.३० वा.
  शाळांमध्ये जाऊन ‘बंद’चे आवाहन - ८.०० वा.
  क्रांती चौकातून ‘बंद’चे आवाहन - १०.०० वा.
  सयाजी शिंदे यांचा कार्यक्रम उधळला - १०.३० वा.
  टीव्ही सेंटरला आंदोलक रस्त्यावर - १०.३० वा.
  क्रांती चौकातील पेट्रोलपंप बंद - ११.०० वा.
  पोलिसांच्या सूचनेनंतर एसटी बस बंद - ११.१५ वा.
  मिळेल त्या खासगी वाहनांद्वारे लोक मार्गस्थ - दिवसभर
  विद्यापीठातील विभाग बंद करण्याचे आदेश - ११.१५ वा.
  दोन आंदोलक ‘घाटी’त दाखल - ११.३० वा.
  अदालत रोडवरील शोरूमची तोडफोड - ११.३० वा.
  क्रांती चौक ते चिकलठाणा दुचाकी फेरी - १२.०० वा.
  सिल्लेखाना ते क्रांती चौक मार्ग बंद - १२.०० वा.
  निराला बाजार येथील दुकानांना फेरआवाहन - १२.०० वा.
  निराला बाजारमध्ये हॉटेलवर दगडफेक - १२.१५ नंतर
  शहराच्या अनेक भागांत बंद उत्स्फूर्त - दिवसभर
  हर्सूल भागात आंदोलक रस्त्यावर - दुपारी १.०० वा.
  एसटी महामंडळाची बस फोडली - १.१५ वा.
  पोलिस कर्मचारी काटगावकर मृत घोषित - १.४५ वा.
  क्रांती चौकात जमाव जमण्यास सुरवात - दुपारी २.१५ वा.
  सरकारविरोधात घोषणाबाजी - दुपारी ४ पासून
  आंदोलक-शिवसैनिक क्रांती चौकात भिडले - ५.३० वा.

बागडेंच्या दिशेने धाव घेत घोषणाबाजी
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलक चांगलेच संतापले आहेत. मंगळवारी (ता. २४) महानंदच्या कार्यालयात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे असल्याची माहिती मिळताच आंदोलक तरुणांनी त्यांच्या दिशेने धाव घेत जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी श्री. बागडे यांना याबाबत माहिती दिली. त्यावर बागडे यांनी तीन-चारजणांना चर्चेला बोलवा, अशी सूचनाही केली; मात्र आंदोलक आक्रमक असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनीच मधस्थीची भूमिका घेत आंदोलकांना तेथून बाहेर काढले.

घोषणेवरून क्रांती चौकात वाद
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात मुख्यमंत्र्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल घोषणा दिल्याने आंदोलक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना मंगळवारी (ता.२४) सायंकाळी पाचच्या सुमारास क्रांतीचौक येथे घडली. यावेळी पोलिसांनी काही युवकांना ताब्यात घेतले होते. मात्र, महिलांसह समाजबांधवांनी पोलिसांची गाडी अडवून युवकांची सुटका केली. आंदोलकांनी प्रारंभी मुख्यमंत्री आणि नंतर शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यावर राजेंद्र जंजाळ आणि शिवेसना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, बाळासाहेब थोरात यांनी आक्षेप घेतला. त्यावरून वाद आणि नंतर बाचाबाचीही झाली. आम्ही सरकारमधील प्रत्येकाविरुद्ध घोषणा देणारच, कोणत्याही राजकीय नेत्याला सहभागी करून घेणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. त्यामुळे काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता. 

इंटरनेट सेवा आज सुरू होणार?
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय म्हणून  इंटरनेट सेवा मंगळवारी बंद करण्यात आली. शहरासह जिल्हाभरात ही सेवा बंद होती. तसेच मेसेजही बराच वेळ सेंड होत नव्हते. दरम्यान, बुधवारी (ता. २५) सकाळी इंटरनेट सेवा सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com