#MarathaKrantiMorcha आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यापासून अस्वस्थ, खिन्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

देवगाव रंगारी  - विष घेऊन आत्महत्या केलेले जगन्नाथ सोनवणे हे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यापासून कायम अस्वस्थ, खिन्न राहत असत. कुटुंबीय, निकटवर्तीयांशी चर्चा करताना समाजाविषयीची त्यांची तळमळ दिसत असे. 

देवगाव रंगारी  - विष घेऊन आत्महत्या केलेले जगन्नाथ सोनवणे हे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यापासून कायम अस्वस्थ, खिन्न राहत असत. कुटुंबीय, निकटवर्तीयांशी चर्चा करताना समाजाविषयीची त्यांची तळमळ दिसत असे. 

देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील जगन्नाथ विश्वनाथ सोनवणे हे शिवाजी चौकात राहतात. ते ‘तात्या’ नावाने परिचित होते. त्यांच्या परिवारात पत्नी रुख्मणबाई, भारत व भगवान ही दोन मुले, सुना आहेत. त्यांना सविता ही मुलगी असून, ती विवाहित आहे. घरची दोन एकर कोरडवाहू शेती असल्याने परिस्थिती बेताचीच आहे. शेतीवर परिवाराचा उदरनिर्वाह होत नसल्याने ते बाहेर मोलमजुरी करीत असत. त्यांना शिक्षणाची, वाचनाची आवड होती.

शिक्षणाचे महत्त्व ते जाणून होते. त्यामुळेच त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मोठा मुलगा भारत यांना डी.फार्मसी.पर्यंत शिकविले. भारत अभ्यासात हुशार असल्याने ‘एमपीएससी’मार्फत ते तलाठी झाले. लहान मुलगा भगवान हा बाजार समितीत रोजंदारीवर काम करतो.

वाचनाची आवड 
जगन्नाथ सोनवणे यांना वृत्तपत्र वाचनाची आवड होती. त्यामुळे जगातील घडामोडींची त्यांना माहिती असे. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे आल्यानंतर त्यांची समाजाविषयीची तळमळ ते बोलून दाखवीत असत. आपला मुलगा नोकरीला लागला; परंतु आपल्या समाजाला जर सवलती असत्या तर इतर मुलेही उच्चशिक्षण घेऊ शकली असती. तीही नोकरीला लागली असती.

नातेवाइकांची, समाजाची मुले हुशार आहेत; परंतु भरमसाट शुल्क भरण्यासाठी पैसे नसल्याने शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना कसरत करावी लागत असल्याचे पाहून त्यांचे मन खिन्न होत असे. याविषयी ते नेहमी नातेवाइकांसोबत चर्चा करीत असत. सरकार आरक्षण देत नाही. पाऊस नसल्याने शेती करता येत नाही. त्यामुळे मुलांचे शिक्षण कसे पूर्ण करावे, याबाबत चिंता व्यक्त करीत असत. याचदरम्यान आरक्षणाचा लढा सुरू झाला. आंदोलने सुरू झाली. यातच समाजातील युवकांना न्याय मिळावा, या उद्देशाने त्यांनी ‘रास्ता रोको’च्या दिवशी शेतात जाऊन विषारी औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

Web Title: #MarathaKrantiMorcha maratha reservation agitation jagannath sonawane