#MarathaKrantiMorcha दुकानांना टाळे, व्यवहारही थांबले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरीत उडी मारून आत्महत्या केल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मंगळवारी (ता. २४) बंद पुकारला होता. या बंददरम्यान औरंगाबादकरांनी आपल्या बाजारपेठा बंद करीत प्रतिसाद नोंदविला. यादरम्यान अदालत सरोडवरील चारचाकी शोरूमचे मात्र दगडफेकीत नुकसान झाले. 

औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरीत उडी मारून आत्महत्या केल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मंगळवारी (ता. २४) बंद पुकारला होता. या बंददरम्यान औरंगाबादकरांनी आपल्या बाजारपेठा बंद करीत प्रतिसाद नोंदविला. यादरम्यान अदालत सरोडवरील चारचाकी शोरूमचे मात्र दगडफेकीत नुकसान झाले. 

मराठा क्रांती मोर्चातर्फे मंगळवारी पुकारण्यात आलेल्या बंदला औरंगाबाद शहरातून मोठा प्रतिसाद मिळाला. शहराच्या मुख्य बाजारपेठांसह अंतर्गत भागातील दुकानेही या वेळी बंद ठेवण्यात आली. बाबा पेट्रोलपंप, अदालत रोड, समर्थनगर, निराला बाजार, औरंगपुरा, मछली खडक, गुलमंडी, सिटी चौक, टीव्ही सेंटर परिसर, बळिराम पाटील शाळा परिसर, बजरंग चौक, मुकुंदवाडी, आविष्कार चौक, शहानूरमियाँ दर्गा चौक भागात बंद पाळण्यात आला. सकाळच्या टप्प्यात दुकाने उघडणाऱ्यांना आंदोलकांनी आवाहन करीत आपली दुकाने बंद करण्यास सांगितले आणि त्यानंतर उघडी दुकानेही बंद झाली. 

चारचाकी शोरूम फोडले 
शहरातील सराफा भागात असलेल्या सराफ व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांना टाळे लावत बंद पाळला. सोन्याचे व्यवहार शंभर टक्के बंद होते. शहरात असलेल्या ऑटो शोरूमचा व्यवहारही संपूर्णपणे बंद होता. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास काही तरुणांनी पगारिया ऑटोच्या शोरूमवर दगडफेक केली. यात शोरूमचे नुकसान झाले असून, दर्शनी भागातील काचा आणि त्याच्या आत उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. 

हातगाड्या गायब, वाहनेही तुरळक 
बाजारपेठांमध्ये उभ्या असलेल्या हातगाड्याही बंदमुळे गायब होत्या. शहरातील कपडा बाजारपेठा बंद राहिल्या, हातगाडीवाले बंदमुळे रस्त्यावर आलेच नाहीत. शहराची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रस्त्यावरही वाहनांची संख्या मंगळवारी बंदमुळे रोडावली होती. रस्त्यावरून सर्वसामान्यांना आपल्या ठिकाणावर नेणाऱ्या रिक्षाही या वेळी जवळपास बंद असल्याने प्रवाशांचे हाल झाल्याचे पाहायला मिळाले. 

हर्सूलमध्ये बसवर दगडफेक 
हर्सूल गावात तरुणांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली. त्यानंतर व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास सांगितले. दरम्यान, एका एसटी बसवर काही तरुणांनी दुपारी एकच्या सुमारास दगडफेक केली. त्यानंतर हर्सूल पोलिसांनी घटनास्थळी पोचून परिस्थिती आटोक्‍यात आणली.

Web Title: #MarathaKrantiMorcha maratha reservation agitation shop close