#MarathaKrantiMorcha एसटीच्या साडेबाराशे फेऱ्या रद्द

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

औरंगाबाद - मराठा आंदोलनाचा मोठा फटका एसटीला बसला आहे. मंगळवारी (ता. २४) दिवसभरात एसटीच्या १,२३५ फेऱ्या रद्द कराव्या लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. आंदोलन चिघळत असल्याने पोलिसांच्या सूचनेनंतर सर्व सेवा बंद करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी यांनी दिली. 

औरंगाबाद - मराठा आंदोलनाचा मोठा फटका एसटीला बसला आहे. मंगळवारी (ता. २४) दिवसभरात एसटीच्या १,२३५ फेऱ्या रद्द कराव्या लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. आंदोलन चिघळत असल्याने पोलिसांच्या सूचनेनंतर सर्व सेवा बंद करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी यांनी दिली. 

औरंगाबाद विभागात मंगळवारी दुपारी दोनपर्यंत ७२९ फेऱ्या अपेक्षित असताना, केवळ ८६ फेऱ्या झाल्या होत्या. दिवसभरात १,३२१ फेऱ्या अपेक्षित होत्या; मात्र आंदोलनामुळे एकूण १२३५ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. फेऱ्या रद्द झाल्याने पन्नास लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले, तर दोन दिवसांत दहा बसगाड्या फोडल्याने जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या ठिकाणी फोडल्या बसगाड्या 
 औरंगाबाद ते नांदेड ही बस बोरी तांडा येथे
 गंगापूर ते लासूर ही लासूर बसस्थानकाजवळ
 कन्नड ते औरंगाबाद- पानपोई फाटा येथे 
 अक्कलकुवा ते औरंगाबाद-कन्नड स्थानकासमोर
 पैठण ते औरंगाबाद-नक्षत्रावडीजवळ
 औरंगाबाद ते पंढरपूर दोन गाड्या-झाल्टा फाटा येथे 
 गंगापूर ते औरंगाबाद-शंकरपूर फाटा 
 औरंगाबाद ते लासूर ही देवसावंगी फाटा येथे  

बसस्थानक रिकामे  
आंदोलनात जमावाने वसमत आगारात घुसून बसगाड्यांची तोडफोड केल्याची माहिती मिळताच उपमहाव्यवस्थापक मधुकर पटारे यांनी दक्षतेच्या सूचना केल्या. जिल्हानिहाय आगार व्यवस्थापकांनी पोलिस अधीक्षकांना भेटून किंवा त्यांच्याशी बोलून आगारांच्या सुरक्षेसाठी तत्काळ व्यवस्था करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रत्येक आगार व्यवस्थापकांनी केलेल्या मागणीनुसार बसस्थानकांनाही पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता. बसस्थानकांचे इन व आऊट अशी दोन्ही गेट लावून घेण्यात आले होते.

Web Title: #MarathaKrantiMorcha maratha reservation agitation ST Bus