#MarathaKrantiMorcha फुलंब्रीत टाकीवर आंदोलकांचा ठिय्या

फुलंब्री - येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करताना मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते.
फुलंब्री - येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करताना मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते.

फुलंब्री - येथे मंगळवारपासून मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरू असून, गुरुवारी (ता. २६) या आंदोलनातील सात आंदोलनकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. जोपर्यंत स्थानिक आमदार, खासदार येऊन आपली भूमिका मांडत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे त्यांनी सांगितले. 

फुलंब्री टी पॉईंट येथे मंगळवारी रास्ता रोको करून ठिय्या आंदोलन सुरू केले. अद्याप स्थानिक आमदार, खासदार यांच्यापैकी कुणीही आंदोलनाकडे फिरकले नाही. त्यामुळे सुधाकर शिंदे, शैलेश बोरसे, प्रमोद गायकवाड, प्रभाकर भुसारे, काकासाहेब जाधव, नंदू मोटे, ज्ञानेश्वर जाधव या सात कार्यकर्त्यांनी गुरुवारी फुलंब्रीतील वॉर्ड क्रमांक १४ परिसरातील पाण्याच्या टाकीवर चारच्या दरम्यान चढून आंदोलन सुरू केले. स्थानिक आमदार व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी आपली भूमिका मांडावी नसता आम्ही टाकीवरून उडी घेऊन जीव देऊ, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी जाहीररीत्या दिला. त्यांनी टाकीवर रॉकेलची कॅन, कीटकनाशक सोबत नेलेले आहे. प्रशासनाशी बोलण्यासाठी माईक सिस्टिमही सोबत नेली आहे. ही माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले. 

जनभावना शासनाला कळविणार 
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली असून, सदर मागणी तत्काळ शासनाकडे सादर करण्यात येईल. फुलंब्री येथील आंदोलनाची तीव्रता व जनभावना शासनाला कळविण्यात येईल, असे लेखी आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

आंदोलकांवर कारवाई नाही 
पाण्याच्या टाकीवर चढून मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता आंदोलन सुरू केले. त्यांची भावना वरिष्ठ कार्यालयास कळविण्यात येईल. त्यामुळे पाण्याच्या टाकीवर चढून सुरू असलेले आंदोलन शांततेत मागे घ्यावे, कुठल्याही आंदोलकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे लेखी आश्‍वासन उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक आम्ले यांनी दिले.

ते सहा तास...
मराठा आरक्षणाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून, सरकार पूर्ण ताकदीनिशी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. न्यायालयात मराठा आरक्षणाची लढाई सुरू आहे. निश्‍चितच आरक्षणाची ही लढाई आपण जिंकू, अशी अपेक्षा हरिभाऊ बागडे यांनी दूरध्वनीवरून व्यक्त केली. त्यानंतरच सहा तास चाललेले हे आंदोलन मागे घेण्यात आले.

प्रशासनाची परीक्षा 
आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक आम्ले, तहसीलदार संगीता चव्हाण, नायब तहसीलदार उद्धव नाईक, प्रशांत काळे, पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, फौजदार विजय जाधव, गणेश राऊत, नगरपंचायत मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com