आत्महत्येपूर्वी प्रमोद आईला म्हणाले, 'मी काय करतो ते बघच'

अतुल पाटील
सोमवार, 30 जुलै 2018

प्रमोद यांना विनोद हा मोठा भाऊ आहे. तर, अकरा वर्षाची स्वप्नगंधा आणि पाच वर्षांचा अथर्व अशी दोन मुले आहेत, असे प्रमोद यांचे सासरे कृष्णात पाटील यांनी 'सकाळ'ला सांगितले.

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी प्रमोद होरे पाटील यांनी काल रात्री रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली होती. तत्पूर्वी, "मी आता काय करतो ते बघच." या आईशी झालेल्या शेवटच्या संवादाने समाजमन हळहळत आहे. आईने रात्रीच्या जेवणासाठी प्रमोद यांना फोन केला होता.

प्रमोद हे मूळचे आंबुलगा (ता. निलंगा, जि. लातूर) येथील आहेत. वडिलांच्या नोकरीनिमित्त त्यांचे कुटूंब पस्तीस वर्षांपासून औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी येथे राहत आहेत. प्रमोद यांची पत्नी सुषमा होरे या खडकीघाट (ता. जि. बीड) याठिकाणी ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. परीक्षेत ३५० मध्ये त्या पहिल्या आल्या होत्या. प्रमोद यांनीही बारावीनंतर कृषी पदविका पुर्ण करुन स्पर्धा परिक्षेची तयारी करत होते. तेदेखील ग्रामसेवक पदासाठी परीक्षा देत होते. चार परीक्षांमध्ये त्यांना अपयश आले. उस्मानाबादची परीक्षा दोन गुणांनी हातातून निसटली होती.

आरक्षणामुळेच हे होत असल्याचे प्रमोद अनेकदा मित्रपरिवारात बोलून दाखवत होते. मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने ते आंदोलनात याच कारणाने सहभागी होत होते. त्याप्रमाणे प्रमोद हे केंब्रिज शाळेजवळील चक्काजाम आंदोलनात काल सहभागी झाले होते. यासाठी ते दुपारी बारा वाजताच घरातून निघून गेले. त्यानंतर फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्येबाबत सूचना दिली होती. दुपारी चारच्या सुमारास मित्रांनी त्यांच्या घरी येऊन प्रमोदने फेसबुकवर लिहिलेला मजकुर वाचून दाखवला. त्यानंतर घरच्यांनी शोधाशोध केली. रात्री नऊच्या सुमारास आई जयमाला होरे यांनी प्रमोद यांना फोन केला. "किती वेळ झाला? कुठे गेला आहेस? असे विचारत लवकर घरी ये! आणि जेवण कर!" असे सांगितले. मात्र, प्रमोद यांनी "आता मी काय करतो ते बघच.." असे म्हणत फोन ठेवून दिला. त्यानंतरही पाच ते सहा जणांनी प्रमोद यांचा शोध घेतला. ते सापडले नाहीत. रात्री बाराच्या सुमारास पोलिसांनी याबाबतची माहिती दिल्याचे प्रमोद यांचे वडील जयसिंग होरे यांनी  'सकाळ'ला सांगितले.

प्रमोद यांना विनोद हा मोठा भाऊ आहे. तर, अकरा वर्षाची स्वप्नगंधा आणि पाच वर्षांचा अथर्व अशी दोन मुले आहेत, असे प्रमोद यांचे सासरे कृष्णात पाटील यांनी 'सकाळ'ला सांगितले.

Web Title: MarathaKrantiMorcha Pramod Patil suicide in Aurangabad