समन्वयक व कार्यकर्त्यांत मतभेद; परळीत मोठा गोंधळ

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

आरक्षण व मेगा नोकर भरतीला स्थगिती या व इतर मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने येथील उपविभागीय कार्यालयापुढे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास मंगळवारी (ता. 7) सायंकाळी स्थगिती दिल्यानंतर समन्वयक व कार्यकर्त्यांत आंदोलन मागे घेण्याबाबत मतभेद झाल्याने मोठा गोंधळ उडाला आहे.
 

परळी वैजनाथ- आरक्षण व मेगा नोकर भरतीला स्थगिती या व इतर मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने येथील उपविभागीय कार्यालयापुढे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास मंगळवारी (ता. 7) सायंकाळी स्थगिती दिल्यानंतर समन्वयक व कार्यकर्त्यांत आंदोलन मागे घेण्याबाबत मतभेद झाल्याने मोठा गोंधळ उडाला आहे.

आंदोलन मागे घेण्याबाबत समन्वयकांनी घाई केली असा आरोप काही तरूण कार्यकर्त्यांनी यावेळी करून हा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे सांगितले. आम्ही आंदोलनावर ठाम आहोत, ज्यांना जायचे आहे त्यांनी जावे अशी भुमिका काही कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यानंतर समन्वयक आबासाहेब पाटील यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

यावेळी एकूण तणाव पाहता पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. मंगळवारी (ता. 07) सायंकाळी साडे आठपर्यंत संतप्त व नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी आबासाहेब पाटील व त्यांचे सहकारी प्रयत्न करत होते. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर विश्वास नाही त्यामुळे आंदोलन कायम पुढे चालू ठेवण्याची भुमिका काही कार्यकर्त्यांनी घेतली आहे. याबाबत आता काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: MarathaKrantiMorcha problems in the parali