मराठा आरक्षणाच्या अहवाल लेखनाला येणार गती

राजेभाऊ मोगल 
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

संस्थांचे आज सादरीकरण
मराठा आरक्षणासंदर्भात समाजाचे सर्वेक्षण पाच संस्थांच्या माध्यमातून केले आहे. यात मुंबई-कोकण विभागात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, पश्‍चिम महाराष्ट्रात गोखले इन्स्टिट्यूट, विदर्भात शारदा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, उत्तर महाराष्ट्रात गुरुकृपा संस्था आणि मराठवाड्यात छत्रपती शिवाजी प्रबोधिनीने सर्वेक्षणाचे काम केले आहे. या संस्थांचे सादरीकरण शनिवारी (ता. चार) होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

औरंगाबाद - सध्या राज्यभर मराठा आरक्षणाच्या मागणीने सरकारला सळो की पळो करून सोडल्यानंतर बैठकांवर बैठका घेण्यास सरकारने सुरवात केली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने तातडीने बोलाविलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शुक्रवारी (ता. तीन) आरक्षणाबाबतच्या अहवाल लेखनाला गती देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आयोग आता युद्धपातळीवर कामाला लागला असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मागील काही वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी केली गेली. मात्र, त्यास मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने व्यापक स्वरूप आले. नऊ ऑगस्ट 2016 ला येथील क्रांती चौकातून निघालेला पहिला मराठा क्रांती मोर्चा ऐतिहासिक ठरला. त्यानंतर राज्यभर, देश आणि विदेशातही 58 मूकमोर्चे निघाले. मागण्यांची हजारो निवेदने शासनाला देण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने समाजाने पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आणि सरकारला कामाला लागावे लागले. सरकार चर्चेची भाषा करीत असले तरी आता चर्चा नको आरक्षणच हवे, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यासाठी राज्यभर दररोज आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर आरक्षणाच्या अनुषंगाने नियुक्‍त करण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाला तातडीने आपला अहवाल देण्यास सांगितले आहे. यासाठी शुक्रवारी पुणे येथे बैठक झाली. या बैठकीत अहवाल लेखनाच्या नियोजनासोबतच सांख्यिकीय आणि सामाजिक विश्‍लेषणासाठी तज्ज्ञांची नियुक्ती, जनसुनावणीत मिळालेल्या निवेदनांचे वर्गीकरण करण्याच्या कामाचे वाटप करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

बैठकीत पहिल्या दिवशी मराठा समाजाचा मागासलेपणा तपासण्यासाठी केलेले सर्वेक्षण, जनसुनावणी आणि राज्य सरकारकडून मागविलेल्या विविध माहितीच्या आकडेवारीचे विश्‍लेषण करून अहवाल लेखनाची दिशा ठरविण्यात आली. माहितीचे विश्‍लेषण करण्यासाठी तज्ज्ञांची नेमणूक केली आहे. यात येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सांख्यिकी तज्ज्ञाची निवड केली आहे. समाजशास्त्रज्ज्ञ म्हणून अमरावतीतील एक व पुण्यातील एक अशा दोघांची नियुक्ती केली आहे. तसेच एका शिक्षणतज्ज्ञाचे मतही विचारात घेण्याचा निर्णय यावेळी घेतला आहे. 

संस्थांचे आज सादरीकरण
मराठा आरक्षणासंदर्भात समाजाचे सर्वेक्षण पाच संस्थांच्या माध्यमातून केले आहे. यात मुंबई-कोकण विभागात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, पश्‍चिम महाराष्ट्रात गोखले इन्स्टिट्यूट, विदर्भात शारदा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, उत्तर महाराष्ट्रात गुरुकृपा संस्था आणि मराठवाड्यात छत्रपती शिवाजी प्रबोधिनीने सर्वेक्षणाचे काम केले आहे. या संस्थांचे सादरीकरण शनिवारी (ता. चार) होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: MarathaKrantiMorcha report for Maratha Reservation