मराठी भाषा गौरव दिन विशेष ः मराठी फुलत, डौलत राहील

Marathi Language Day Celebration Latur
Marathi Language Day Celebration Latur

लातूर : मराठी भाषेचे अस्तित्व धोक्यात आले आहे, अशी चिंता वारंवार व्यक्त केली जाते. पण, भाषेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे, या प्रश्नाचे उत्तर शोधताना बोटावर मोजण्याइतक्या व्यक्ती आणि संस्था पाहायला मिळतात. केवळ सरकार पातळीवरच नव्हे तर सामुदायिक प्रयत्नांतूनच मराठी भाषेला बदलत्या काळाची पावले ओळखून आणखी संपन्न, आणखी श्रीमंत बनवता येईल. यातनूच मराठी यापुढेही डौलत-फुलत राहील अशी अपेक्षा साहित्यिकांमधून व्यक्त होत आहे. मराठी भाषा गौरवदिनानिमित्ताने ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला.

मराठी भाषा अनिवार्य करा
डॉ. जनार्दन वाघमारे (माजी कुलगुरू) : मराठी भाषा विकसित करायची असेल तर सरकारला स्पष्ट धोरण ठरवावे लागेल. इंग्रजी माध्यमाच्या शाळा खेडोपाड्यापर्यंत पसरल्या आहेत. हे चित्र पाहून मराठीचे भवितव्य अंधारात आहे, असे जाणवत राहते. जागतिकीकरणामुळे अनेकांचा ओढा इंग्रजी भाषेकडे वाढला आहे. इंग्रजी भाषा जरूर शिकावी; पण याचा अर्थ मराठीकडे दुर्लक्ष करायचे, असा नाही. म्हणून सरकारने सर्व माध्यमांच्या आणि सर्व मंडळांच्या प्राथमिक शाळेत मराठी भाषा अनिवार्य करायला हवी. प्रशासनात मराठी भाषेचा वापर वाढवायला हवा. याबरोबरच न्यायव्यवस्थेतही मराठीतून व्यवहार झाले पाहिजे. सर्व निकाल मराठीतून देता आले पाहिजे. या दृष्टीने सरकारने पावले टाकणे आजच्या स्थितीत गरजेचे आहे. त्याशिवाय मराठीला भवितव्य नाही.

भाषांतर मंडळ स्थापन व्हावे
डॉ. नागोराव कुंभार (ज्येष्ठ साहित्यिक) : साहित्य-संस्कृती मंडळाच्या धर्तीवर सरकारने ‘महाराष्ट्र राज्य अभिजात ग्रंथ भाषांतर मंडळ’ स्थापन करावे. या माध्यमातून जगभरातील उत्तमोत्तम ग्रंथांतील विचारधन मराठीत आणता येऊ शकेल. सरकारने यासाठी पुढाकार घेतला तर मराठी भाषा आणखी समृद्ध करण्यासाठी नक्कीच मदत होईल. यासंदर्भात सरकारला लवकरच पत्र पाठवून मंडळ स्थापन करण्याची मागणी करणार आहे. मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीही लेखक, वाचक, प्रकाशक आणि सरकार या सर्व पातळ्यांवर प्रयत्न होण्याची गरज आहे. मराठी भाषा मरणार नाही. कारण जतन करून ठेवण्यासाठी आजवर अनेकांनी योगदान दिले आहे. ग्रामीण भागातील तरुणही लिहिते होत आहेत. त्यांना बळ देणे तितकेच गरजेचे आहे.

हेही वाचा ः लातुरातील मालमत्ता सील करणार, आयुक्तांचा मालमत्ताधारकांना इशारा

नवी पिढी मराठीपणापासून दूर जातेय
श्रीकांत देशमुख (कवी) : मराठी ही जगभरातील संपन्न भाषांपैकी एक आहे. या भाषेला मोठा इतिहास आहे. मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण झाले आहे; पण बदलत्या काळानुसार मराठीकडे केवळ मातृभाषा म्हणून पाहून चालणार नाही. मराठी ही ज्ञानभाषा बनली पाहिजे. या भाषेतून व्यवसायाच्या संधी वाढल्या पाहिजेत. बदलत्या काळातील आव्हाने पेलण्याची क्षमता मराठीत निर्माण झाली पाहिजे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने भाषेची व्याप्ती वाढायला हवी. मराठीचे अस्तित्व धोक्यात आले आहे, अशी ओरड वारंवार होत असली तरी ती योग्य वाटत नाही; पण बदलत्या शिक्षणपद्धतीमुळे बऱ्याच कुटुंबांतील संवादाची भाषा हिंदी-इंग्रजी होत चालली आहे. त्यामुळे नवी पिढी मराठीपणापासून दूर जातेय, याकडेही आपण गांभीर्याने पाहायला हवे.


पुस्तक विकत घेण्याचा सुसंस्कृतपणा वाढावा
शेषराव मोहिते (ग्रामीण साहित्यिक) : सातवा आयोग लागू झाला. अनेकांचे पगार वाढले; पण पुस्तकांच्या दुकानात जाऊन पुस्तके विकत घेण्याची वृत्ती, सुसंस्कृतपणा अजूनही वाढला नाही. ज्यांना पुस्तकांबाबत प्रेम आहे, त्यांच्या खिशात मात्र पैसा नाही, अशी स्थिती आहे. समाज जोपर्यंत आर्थिकदृष्ट्या संपन्न होणार नाही, तोपर्यंत भाषा ‘श्रीमंत’ होणार नाही. पोटासाठी, उद्योगासाठी अनेकांना इंग्रजीचा आधार घ्यावा लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे. हे चित्र बदलण्यासाठी संपन्न समाज निर्माण व्हायला हवा. कुठल्याही देशात संपन्नता आली म्हणून तिथल्या भाषा टिकल्या, हे आपल्याला पाहायला मिळाले आहे. यादृष्टीने सरकारने पावले टाकायला हवीत. लेखकांनीही इंग्रजीत लिहिण्याऐवजी आपल्या मातृभाषेतून ताकदीच्या कलाकृती निर्माण कराव्यात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com