मराठी भाषा ही संतवाणी आहे : डॉ. सदानंद मोरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

संस्कृत भाषेला देववाणी म्हंटले जाते तसे मराठी भाषा ही संतवाणी आहे. या भाषेला संतांनी घडवले आहे. जे ज्ञान संस्कृतमध्ये आहे, तसे त्यांनी मराठीत निर्माण केले. साहित्य, तत्वज्ञानातून संतांनी मराठी भाषेचे वैभव वाढवले. असे स्पष्ट मत ज्येष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी येथे व्यक्त केले.

लातूर : "संस्कृत भाषेला देववाणी म्हंटले जाते तसे मराठी भाषा ही संतवाणी आहे. या भाषेला संतांनी घडवले आहे. जे ज्ञान संस्कृतमध्ये आहे, तसे त्यांनी मराठीत निर्माण केले. साहित्य, तत्वज्ञानातून संतांनी मराठी भाषेचे वैभव वाढवले. त्यातूनच त्यांनी समाजात एकात्मतेचे बंध निर्माण केले. हे बंध जातीभेद, लिंगभेदाला पुरून उरणारे आहे", असे स्पष्ट मत ज्येष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी येथे व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने 'महाराष्ट्राची जडणघडण आणि संत साहित्याचे योगदान' या विषयावर डॉ. मोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी माजी खासदार गोपाळराव पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे, सचिव डॉ. नागोराव कुंभार उपस्थित होते.

डॉ. मोरे म्हणाले, "महाराष्ट्र हे नुसते राष्ट्र नाही. महा-राष्ट्र आहे. महाराष्ट्राची 'महा' ही ओळख वेगवेगळ्या कारणांमुळे बनली आहे. महाराष्ट्रात अनेक महापुरुष निर्माण झाले. त्याप्रमाणे संतही होऊन गेले. महाराष्ट्राच्या जडण घडणीचा विचार करताना मराठी भाषा घडविण्यात संतांचा मोठा आहे, हे कोणाला नाकारता येणार नाही. कीर्तन, वारी, दिंड्या या माध्यमातून भाषा, साहित्य, नवे विचार संतांनी लोकांपर्यंत आणले. खुलेपणा, व्यापकता हे संतांच्या साहित्याचे वैशिष्टय आहे. त्यांच्या लेखनात गूढता अजिबात नाही."

डॉ. वाघमारे म्हणाले, "संतांनी भक्तीचे आंदोलन महाराष्ट्रव्यापी केले. त्यातून त्यांनी भाषा घडवली. संस्कृती निर्माण केली. संस्कृतीत माधुर्य, गोडवा फुलवला. विचारांचा प्रकाश निर्माण केला. समतेचा संदेश दिला. सामाजिक क्रांती घडवली. माणूस म्हणून कसे जगावे, हे संतांनी आपल्या साहित्यातून सांगितले. माणुसकीची शिकवण दिली. संतांच्या या कार्याचा तौलनिक अभ्यास व्हायला हवा." विवेक सौताडेकर यांनी सूत्रसंचालन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi language is very important says Dr. Sadanand More