महापालिकेत कचरा टाकण्याचा एमआयएमचा डाव उधळला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

औरंगाबाद - कचराकोंडी सोडविण्यात महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप एमआयएम पक्षाकडून वारंवार करण्यात येत आहे. सोमवारी (ता. 19) सर्वसाधारण सभा सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकण्याचा बेत आखला होता; मात्र महापौरांनी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागवून घेतल्याने हे आंदोलन फसले. 

सोमवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा होती. त्यानुसार दुपारी कचऱ्याच्या प्रश्‍नावरून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यासाठी महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकून आंदोलन करण्याचा एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बेत आखला होता. याबाबत कुणकुण लागताच महापौरांनी अधिकचा पोलिस बंदोबस्त सिटी चौक पोलिसांकडून मागवून घेतला. त्यानुसार गेटवर पोलिसांनी बंदोबस्त लावला. या वेळी कचऱ्याने भरलेले ट्रॅक्‍टर महापालिका मुख्यालयासमोरील चौकात आले. त्यानंतर धाव घेत पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटकाव केला. कचरा टाकल्यास अटक करून गुन्हे दाखल केले जातील, असा दमच त्यांनी दिला. त्यामुळे शांततेत आंदोलन तरी करू द्या, अशी गळ कार्यकर्त्यांनी घातली व कचऱ्याचे ट्रॅक्‍टर आणून त्यावर उभे राहत घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, स्थायी समिती सभापती व शहर अभियंत्यांची कार अडविण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला; मात्र पोलिसांनी त्यांना दूर केले. 

Web Title: marathi news amc MIM garbage