गळ्यात पाट्या घालून कर्जबुडव्यांचे फोटो काढणार का? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 मार्च 2018

तुळजापूर - नुकसानग्रस्त शेतीक्षेत्राचे पंचनामे करताना गुन्हेगारांप्रमाणे शेतकऱ्यांच्या गळ्यात पाट्या घालून फोटो काढणारे सरकार कर्जबुडव्यांबाबत असे करणार का, असा सवाल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी केला. 

तुळजापूर - नुकसानग्रस्त शेतीक्षेत्राचे पंचनामे करताना गुन्हेगारांप्रमाणे शेतकऱ्यांच्या गळ्यात पाट्या घालून फोटो काढणारे सरकार कर्जबुडव्यांबाबत असे करणार का, असा सवाल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी केला. 

येथे कॉंग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाले, ""एका बुलेटप्रूफ गाडीसह 225 व्हीआयपी गाड्या खरेदीचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यातून जनतेचा पैसा उधळण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचा नावावर ढोंग केले जात आहे. राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून 13 हजार 500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्जमाफी झाल्यानंतर दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. काही शेतकऱ्यांना प्रमाणपत्रे देऊनही कर्जमाफी मिळाली नाही. 15 हजार कोटी रुपयांचे बोंड अळीमुळे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानापोटी 313 कोटींची घोषणा केली आणि योग्य अंमलबजावणीअभावी शेतीक्षेत्राचे तीन तेरा वाजविले. गारपीटग्रस्त शेतीक्षेत्राचे पंचनामे करताना शेतकऱ्यांच्या गळ्यात सराईत गुन्हेगारासारख्या पाट्या घालणारे सरकार कर्जबुडवे उद्योगपती नीरव मोदी, मेहुल चोक्‍सी, विजय मल्ल्या यांच्या गळ्यात पाट्या घालून फोटो काढणार का? या सरकारने जाहिरातींवर तीन हजार कोटी खर्च केला. प्रसिद्धी, झगमगटातील हे सरकार आहे.'' 

Web Title: marathi news ashok chavan marathwada tuljapur farmer