दिवस उगवताच महापालिकेने परत भरला कचरा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

लेखी आश्वासन दिल्यानंतर महापालिकेने मंगळवारी सकाळीच पाच ट्रॅक्टर कचरा परत उचलण्यात आला. 

औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसीमध्ये महामंडळाच्या परवानगीशिवाय कचऱ्याचे ट्रक रिकामे करणाऱ्या महापालिकेला सोमवारी (ता. 12) उद्योजकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. लेखी आश्वासन दिल्यानंतर महापालिकेने मंगळवारी सकाळीच या ठिकाणाहून पाच ट्रॅक्टर कचरा परत उचलला आहे. 

कचरा कुठे टाकावा या विवंचनेत असलेल्या महापालिकेने चिकलठाणा एमआयडीसीच्या मोकळ्या जागेत तो गुपचूप टाकण्याचा प्रयत्न सोमवारी केला. पण उद्योजकांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी विरोध करत आलेल्या ट्रकमध्ये कचरा परत भरायला लावला. पण कचरा अधिक असल्याने तो भरण्यासाठी हवी असलेली अधिक कुमक देण्यास महापालिकेने असमर्थता दर्शवली. दुसऱ्या दिवशी अर्थात मंगळवारी (ता. 13) हा कचरा उचलण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यावर हे प्रकरण शांत झाले. महापालिकेने आज मंगळवारी  सकाळीच येथून 5 ट्रॅक्टर कचरा जेसीबीच्या साहाय्याने भरला. सकाळी अकरापर्यंत भरून उभे असलेले हे ट्रॅक्टर कुठे रिकामे करावे यावर निर्णय न झाल्याने ते एमआयडीसीमध्येच उभे होते.

Web Title: marathi news aurangabad garbage corporation midc garbage truck