बसस्थानकात ‘घुसखोरी’ करून ‘उचलेगिरी’!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

बसस्थानकामध्ये अर्ध्या तासासाठी आलेल्या प्रवाशांच्या नातेवाइकांना दहा ते वीस रुपये देणे परवडत नाही. त्यामुळे मोफत पार्किंग करावी, ही मागणी एसटीने मान्य करून बोर्डही लावला आहे. त्यानंतरही जर पोलिस वाहने उचलत असतील तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही. 
- सुग्रीव मुंडे, जिल्हा समन्वयक, आम आदमी पार्टी 

औरंगाबाद - वाहतूक पोलिस बसस्थानक आणि रेल्वेस्थानकात घुसून वाहने उचलण्याचे काम करीत आहेत. बसस्थानकात प्रवाशांना सोडण्यासाठी आलेल्या नातेवाइकांची दुचाकी वाहने उचलू नयेत, असे पत्र एसटीने दिल्यानंतरही वाहतूक पोलिसांची बसस्थानकातील लुडबूड थांबत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. 

शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न दिवसेंदिवस बिकट होत आहे. रस्त्यावर बेशिस्त वाहने पार्किंग करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे वाहने आहेत. रस्त्यावर बेशिस्त वाहने लावणाऱ्यांची वाहने उचलून नेण्याची कारवाई करणे असा हेतू यामागे आहे. मात्र या वाहनांवर काम करणारे पोलिस कर्मचारी आणि त्यावरील खासगी कर्मचारी अक्षरश: मनमानी करीत आहेत. रस्त्यावर डांबरी रस्त्याच्या दूरवर पाच ते पंधरा फुटांपर्यंतची वाहने (रस्त्यात अडथळा नसलेली) उचलून नेण्याचे काम हे कर्मचारी करत आहेत. त्याचप्रमाणे रेल्वेस्थानक आणि बसस्थानकातही वाहने उचलून तेथील खासगी ठेकेदारांना अप्रत्यक्ष मदत करण्याचे काम वाहतूक पोलिस करीत आहेत. मुळात रेल्वेस्थानकात किंवा बसस्थानकामध्ये संबंधित खात्याची यंत्रणा कार्यरत असून, बसस्थानकात अथवा रेल्वेस्थानकात कुणी बेशिस्त वाहन लावले तर एसटीचे किंवा रेल्वेचे अधिकारी कारवाई करतील, ती त्यांची जबाबदारी आहे. असे असताना, ही जबाबदारी पोलिस का पार पाडत आहेत? बसस्थानक आणि रेल्वेस्थानकातील ठेकेदाराला मदत करण्यासाठी शहर वाहतूक पोलिस बसस्थानक आणि रेल्वेस्थानकातील वाहने उचलत आहेत का, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. बसस्थानकात मोफत पार्किंगसाठी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर त्याची दखल घेऊन विभाग नियंत्रकांनी बसस्थानकात दर्शनी भागात प्रवाशांना सोडण्यासाठी आलेल्यांना काही वेळासाठी मोफत पार्किंग करण्याचा निर्णय जाहीर केला. या भागातील वाहने उचलून नेऊ नयेत, असे पत्र विभाग नियंत्रकांनी वाहतूक पोलिसांनाही दिले आहे. असे असतानाही मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक व रेल्वेस्थानकात घुसून कारवाई करण्याचा वाहतूक पोलिसांचा अट्टहास कायमच असल्याने पोलिसांच्या हेतूबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.  

बसस्थानकाच्या दर्शनी भागात उभ्या राहणाऱ्या वाहनांसंदर्भात वाहतूक पोलिसांनी एसटीच्या नियंत्रण कक्षातील, ध्वनिक्षेपकावरून सूचना देणे आवश्‍यक आहे. सूचना देऊनही जर वाहनाजवळ कुणी आले नाही, तरच वाहन उचलणे अपेक्षित आहे. यापुढे प्रवाशांना सोडण्यासाठी आलेल्यांची वाहने उचलू नयेत, अशा सूचना दिल्या जातील. 
- हनुमंत गिरमे, पोलिस निरीक्षक वाहतूक, सिडको 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news aurangabad marathwada news busstop parking Infiltration